राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांकडून महिलांना न्याय मिळण्याची शक्यता नाही – रेखा ठाकूर

Rekha Thakur-Anil Deshmukh

औरंगाबाद : खैरलांजी घटनेच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असतानाही पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला नव्हता़. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडेच गृहखाते आहे़. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणावर त्यांच्याकडून न्याय मिळण्याची शक्यता कमीच आहे़. सिल्लोड घटनेत त्यांची भूमिका आक्षेपार्ह असल्याने सामाजिक संघर्ष वाढेल, अशी टीका वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला अत्याचार विरोधी परिषदे पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. खैरलांजी प्रकरणात तत्कालीन आघाडी सरकारचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. त्यांची भूमिका पीडित कुटुंबाला न्याय देणारी नव्हती.

उलट खैरलांजी गावाला तंटामुक्त गावाचे पारितोषिक देण्यात आले. पीडितांना न्याय मिळाला नसल्याचे आजही वाटते.

वंचित महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलने सुरू केली आहेत. या प्रश्नाची तड लावण्यासाठी आंदोलने आहेत, असे ठाकूर म्हणाल्या.

महिला अत्याचारात स्त्री-पुरुष सत्ता आणि जातीव्यवस्थेची सांगड

राज्यात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांबाबत अंजली आंबेडकर यांनी चिंता व्यक्त करत महिला अत्याचारात क्रूरता वाढली असल्याचे म्हटले़ या घटनांचा सखोल तपास आणि शिक्षा होताना दिसत नाही. महिला अत्याचारात स्त्री-पुरुष सत्ता आणि जातीव्यवस्थेची सांगड दिसत आहे. या घटकांवर चर्चा करुन वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचे प्रबोधन करण्यासाठी परिषद घेत असल्याचे अंजली आंबेडकर म्हणाल्या.

वंचितच्या आगामी राजकीय वाटचालीवर अंजली आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याची वंचितची भूमिका आहे. एनआरपी, सीएए, एनआरसी ठाम भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी आहे. नागरिकत्व कायद्याचा प्रश्न हा फक्त मुसलमानांचा प्रश्न असल्याचे भाजप सांगत आहे. त्यातून मुस्लिम विरुद्ध हिंदू असे विघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना ठोस उत्तर फक्त वंचितने दिले. या पद्धतीने स्वत:चे नागरिकत्व सिद्ध करणे फक्त मुस्लिमांचा प्रश्न नाही. भटके-विमुक्त, आदिवासी, स्थलांतरित आणि अशिक्षितांचाही प्रश्न आहे. समविचारी पक्षांच्या प्रतिसादावर पुढील राजकारण अवलंबून असेल, असे आंबेडकर म्हणाल्या.

भ्रष्ट ठेकेदाराशी आदित्य ठाकरेंची चर्चा, मनसेने दिले आव्हान