बीड जिल्ह्यातील 13 हजार उसतोड महिलांची शस्त्रक्रिया करून गर्भपिशव्या काढल्या

abortions were removed by surgery

अंबाजोगाई :- बीड जिल्ह्यातील तब्बल 13 हजार महिलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. या संबंधीचा अहवाल बीड आरोग्य विभागाने चौकशी समितीकडे पाठविला आहे. सर्वेक्षणात सर्वच 82 हजार 900 ऊसतोड महिलांची माहिती संकलित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हा विषय विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. या बाबतीत विधिमंडळ चौकशी समितीने बीड जिल्ह्यातील महिलांसोबत संवाद साधून माहिती घेतली.

काही खासगी रुग्णालयांनी जिल्ह्यातील अनेक महिलांना विविध आजारांची भीती दाखवत विनाकारण शस्त्रक्रिया करून गर्भपिशव्या काढल्या जात केल्याचेही काही प्रकरणांत समोर आले होते. त्यानंतर, राज्य सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने दोन महिन्यापूर्वी बीडमधील महिलांशी संवाद साधला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिकांशी बोलून अडचणी व उपाययोजना जाणून घेतल्या होत्या.

जिल्ह्यातील ऊसतोडणीला जाणाऱ्या महिलांची माहिती घेण्याचे आदेश चौकशी समितीने जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर, आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन ऊसतोडणी महिलांची माहिती घेण्यात आली. कधी व कोठे गर्भपिशवी
काढली, याचा तपशील अहवालात आहे. अहवाल चौकशी समितीकडे पाठविण्यात आला आहे. अहवालाचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.