लांडग्याची शेपटी तुटली असून, दात पडले आहेत, मसूद अझहरचा अमेरिकेला टोमणा

Masood Azhar

इस्लामाबाद : अमेरिकेने तालिबांसोबत शांतता करार करणे म्हणजे अमेरिकेची तालिबांपुढे माघार आहे असे सूचित करताना कुख्यात दहशतवादी मसूद अझहर म्हणाला की – अफगाणिस्तानात अमेरिकेचा वावर लांडग्यासारखा होता. पण आज दोहा कतारमध्ये जिहादने एक उंची गाठली आहे, अपेक्षा खूप आहेत. लांडग्याची शेपटी तुटली असून, दात पडले आहेत.

एफएटीएफच्या बैठकीआधी पाकिस्तानने बेपत्ता घोषित केलेला कुख्यात दहशतवादी मसूद अझहर आता समोर आला आहे. अमेरिका-तालिबान करारावर त्याने ऑडिओच्या माध्यमातून उल्लेखित प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात उल्लेखित आहे की भारताला हवा असलेला हा ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी बेपत्ता असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या मसूद अझहरने अमेरिकेबरोबर झालेल्या शांती करारासाठी तालिबानच्या आधीच्या आणि विद्यमान नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आहेत. मसूदने जैशशी संबंधित असलेल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून हा संदेश जारी केला आहे.

शहीदांचे, मुजाहिद्दीन आणि गाझींचे अभिनंदन, हझरत शेख हक्कानीचे अभिनंदन असे मसूदने आपल्या संदेशात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीत असलेल्या मसूद अझहरने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या धोरणाची खिल्ली उडवली आहे.

या शांतता कराराचे तालिबानने पालन केल्यास १४ महिन्यात अमेरिका अफगाणिस्तानातून सर्व सैन्य काढून घेईल.