गृहमंत्र्यांची मोठी घोषणा : कोरोनाकाळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेणार

Deshmukh Anil

मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Corona lockdown) लागू करण्यात आल्यानंतर कलम १८८ नुसार (section-188) जोरदार कारवाया राज्यभरात सुरू करण्यात आल्या होत्या. या कालावधीत राज्यभरात लाखो नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हजारोंना अटकही झाली होती. या सर्वांच्या भवितव्याचा विचार करून आणि कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन गृह विभागाने आता हे गुन्हे मागे घेणार असल्याचं म्हटलंय. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यासंदर्भात घोषणा केली.

लॉकडाऊन काळात नागरिकांनी एकत्र येणे टाळावे याकरिता शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येत होती. पोलिसांनी या काळात नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर खटले भरले आहेत. तर, या खटल्यांचे दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना नोटीसही बजावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य सरकारने हे गुन्हे मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भाची घोषणा एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER