‘या’ बातमीने मान्सूनचे पडघम वाजायला सुरुवात झाली : शिवसेना

Monsoon - Shivsena - Maharashtra Today

मुंबई :- दोन – दोन चक्रीवादळाचे तडाखे बसूनही ठरल्याप्रमाणे मान्सून 1 जूनलाच तो केरळमध्ये आणि महाराष्ट्रातही वेळेनुसारच येईल, अशी सुवार्ता हवामान खात्याने दिली आहे. या बातमीने मान्सूनचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. फक्त प्रार्थना एवढीच की, मान्सूनने ठरल्याप्रमाणे यावे आणि लहरीपणा विसरून ‘ कृपा ‘ वृष्टी करावी, असे शिवसेनेने (Shivsena) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मान्सूनकडे आस लावून बघण्याशिवाय, त्याची चातकासारखी वाट पाहण्याशिवाय आणि तो आल्यावर त्याची प्रार्थना करण्याशिवाय हिंदुस्थानातील बळीराजाला दुसरा पर्याय काय आहे? वैशाख वणव्याचे चटके बसत असताना मान्सूनच्या अंदाजाकडे आपल्या देशाचे डोळे लागलेले असतात. याही वर्षी ते लागले होतेच, असे शिवसेनेने म्हटले आहे.

आजचा सामनातील अग्रलेख :

‘तौक्ते’ चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) देशाच्या पश्चिम किनारपट्टीला आठ-दहा दिवसांपूर्वी तडाखा दिला. आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ 26 मे रोजी पूर्व किनारपट्टीवर हाहाकार उडविणार, अशी भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर देशाचे कृषीचक्र अवलंबून असणाऱ्या मान्सूनचे काय होणार, असा प्रश्न हवामान खात्यापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत सगळय़ांनाच पडला होता. मात्र आता याबाबतीत सुटकेचा निःश्वास टाकावा, अशी बातमी हवामान खात्यानेच दिली आहे. ‘तौक्ते’ काय किंवा ‘यास’ काय, यापैकी कोणत्याही चक्रीवादळाचा परिणाम आपल्या देशातील मान्सूनच्या आगमनावर होणार नाही असा खुलासा हवामान विभागानेच केला आहे. म्हणजे मान्सून ठरल्याप्रमाणे 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल. गेल्या काही वर्षांत हवामान खाते आणि अंदाजाची अचुकता हे पूर्वीसारखे थट्टेचे विषय राहिलेले नाहीत.

सगळे अंदाज बऱ्यापैकी अचूक ठरतात. त्यामुळे सामान्य माणूस, शेतकरी आणि सरकार-प्रशासनापर्यंत सगळेच वेळीच ‘ऍलर्ट’ होऊन आवश्यक उपाययोजना करता येते. खबरदारी घेता येते. याचा अर्थ नुकसान होतच नाही असे नाही. शेवटी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेती, मालमत्तेचे नुकसान होतच असते. जीवितहानीचाही धोका असतोच. परंतु हवामान खात्याचे अंदाज, आपत्तीची पूर्वसूचना योग्य वेळेत आणि अचूक मिळते तेव्हा हे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न सर्व पातळय़ांवरून होऊ शकतो.

आधी असा एक अंदाज होता की, मान्सूनचे आगमन चार दिवस लांबेल, पण आता 1 जूनलाच तो केरळमध्ये प्रवेश करेल, हे जवळजवळ निश्चित आहे. हा एक शुभसंकेतच म्हणावा लागेल. मागील दोन्ही वर्षे अरबी समुद्रातील चक्रीवादळांमुळे मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले होते. यंदा तशी शक्यता नाही आणि 10 जूनपर्यंत तळकोकणात प्रवेश करून मान्सून 15 ते 20 जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रात पसरेल. किंबहुना, सध्याच्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होऊ शकतो अशीही शक्यता आहे. तसे झाले तर कोकण (Konkan) आणि मुंबईसह महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन आणखी अलीकडे होऊ शकते. ते होईल की नाही हे नंतरच समजेल, पण मान्सून लांबणार नाही हे तूर्त महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशाचे कृषीचक्र आणि अर्थव्यवस्था ही मान्सूनवरच अवलंबून असते. मात्र हाच मान्सून अनेकदा लहरीप्रमाणे वागतो आणि होत्याचे नव्हते करतो. मागील काही वर्षांत तर वेळेवर आलेला मान्सून नंतर अचानक ‘बेपत्ता’ होतो, जुलै महिन्यात धुवांधार पर्जन्यवृष्टी होते. महिन्याची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मान्सूनची ‘स्वारी’ परत गायब होते. कधी पावसाळा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत लांबतो. त्यामुळे पर्जन्य सरासरी साधली जाते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटतो, पण शेती, पीकपाण्याचे वेळापत्रक मात्र बिघडते. कधी दुबार-तिबार पेरणीची वेळ बळीराजावर येते.

कधी पेरणीनंतर कोंब फुटलेले पीक पाऊस लांबल्याने मान टाकते, तर कधी काढणीसाठी आलेले पीक, फळफळावळ अतिवृष्टीत वाहून जाते. मान्सूनच्या आगमनाबाबत, कोसळण्याबाबत बऱ्यापैकी अचूकता साधणे आपल्या हवामान खात्याला जमले असले तरी त्याच्या ‘लहरी’चा अंदाज अजूनही बांधता आलेला नाही. शेवटी मान्सून हाच आपल्या कृषी व्यवस्थेचा कणा आहे. त्यावरच आपली कृषी व्यवस्था अवलंबून आहे. पुन्हा शेतीचा मोठा हिस्सा आजही कोरडवाहू आहे आणि त्यावर अवलंबून असणारा शेतकरी अल्पभूधारक. त्यामुळे लहरी मान्सूनचा सर्वाधिक तडाखा याच वर्गाला बसतो. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ याच वर्गाच्या वाटय़ाला येते. तरीही मान्सूनकडे आस लावून बघण्याशिवाय, त्याची चातकासारखी वाट पाहण्याशिवाय आणि तो आल्यावर त्याची प्रार्थना करण्याशिवाय हिंदुस्थानातील बळीराजाला दुसरा पर्याय काय आहे? वैशाख वणव्याचे चटके बसत असताना मान्सूनच्या अंदाजाकडे आपल्या देशाचे डोळे लागलेले असतात.

याही वर्षी ते लागले होतेच. मात्र दोन-दोन चक्रीवादळाचे तडाखे बसूनही ठरल्याप्रमाणे 1 जूनलाच तो केरळमध्ये आणि महाराष्ट्रातही वेळेनुसारच येईल, अशी सुवार्ता हवामान खात्याने दिली आहे. या बातमीने मान्सूनचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. फक्त प्रार्थना एवढीच की, मान्सूनने ठरल्याप्रमाणे यावे आणि लहरीपणा विसरून ‘कृपा’वृष्टी करावी, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button