गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

Uddhav Thackrey

मुंबई : अमित शहा यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला याचे दुःख वाटले. गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुखांनी केला आहे. शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप झाला असल्याचे ते म्हणाले. मुंबईतल्या रंगशारदा येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

अमित शहा यांच्या नावाचा वापर करून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडे करते हे मी पाहिले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरे आहे. पण ५०-५० चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर ती चर्चा थांबविल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : युती फाटली, किल्ली पवारांकडे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा  यांच्याविरोधात मी काहीही बोललो नाही.  शब्द देऊन फिरवण्याची वृत्ती शिवसेनेची नाही, तर भाजपची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मी पाहिली.  ती पाहून मला आनंदही वाटला आणि दुःखही वाटले. विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला.   आम्ही सोबत नसतो तर ही विकासकामे तुम्ही करू शकला असता का? असा सवालही ठाकरे यांनी  उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंनी माझे फोन घेतले नाही मात्र राष्ट्रवादी व इतरांशी ते बोलत होते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमित शहा आणि कंपनी विरोधात अविश्वास आहे, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. इतकंच नाही तर मला खोटं ठरवणाऱ्यांशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करू नये, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मी खोटेपणा केलेला नाही, भाजप खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपने केला आहे.  मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा जे काही ठरले होते ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे.  तरीही ते मला खोटे ठरवत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.