नारायण राणेंच्या मध्यस्थीने ‘बेस्ट’ कर्मचा-यांचा संप मागे

Narayan Rane

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या मध्यस्थीने मुंबईतील बेस्ट कर्मचा-यांचे तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले. कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेस्ट कृती समितीतर्फे वडाळा आगार येथे मागील तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. शिवसेनेने बेस्ट बुडवली आहे, असा आरोप करत काहीही झाले तरी बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नसल्याचे राणे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सुरु असलेले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करत गौरी-गणपतीपर्यंत तुमच्या मागण्यांवर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही तर यापुढे होणार्‍या आंदोलनात मी तुमच्या सोबत असेन असा विश्वास त्यांनी उपोषणकर्त्यांना दिला.

खासदार नारायण राणे यांनी आज सायंकाळी वडाळा आगार येथे दाखल होत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. राणेंच्या आवाहनानंतर बेस्ट कृती समितीने सुरु असलेले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. दरम्यान, आज दुपारी उपोषणावेळी शशांक राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.