अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली : निलेश राणेंचा आरोप

मुंबई :- ‘स्व. बाळासाहेब होते का स्वातंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली. तो इतिहास लोकं विसरलेली नाही,’ असे म्हणत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच. पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा संघ’ परिवार कोठे होता? 1947 चा स्वातत्र्यदिनही संघाने मानला नाही, असे म्हणत शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे पुढे सरसावले आहेत. निलेश राणे यांनी शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने आता शिवसेनाही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ‘‘तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगत आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली होती.

‘काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणा-या संघटना 2002 पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने ‘तिरंगा’ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे,’ असे म्हणत ही टीका करण्यात आली होती.