‘त्या’ २७ गावांसाठी नगरपालिकेकरिता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

जनभावनेशी सुसंगत सकारात्मक निर्णय घेणार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

eknath shinde and cm uddhav thackeray

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समिती आणि युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. या भागातील जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, जगन्नाथ शिंदे, माजी आमदार सुभाष भोईर, नगरविकास (२) विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त गोविंदराज, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, संघर्ष समितीचे गुलाब वझे, यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि संघर्ष समिती व युवा मोर्च्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री शिंदे यावेळी म्हणाले, जनभावना समजून घेण्याकरिता आज बैठक घेतली आहे. २७ गावांतील नागरिकांना महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका हवी आहे तर काहींना ही गावे महापालिकेत समाविष्ट राहावी, असे वाटते. दोन्ही बाजूंना न्याय मिळावा, या भूमिकेतून आपण पुढे जाऊ या, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर या भागात विकास झाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. असे स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, मी भूमिपुत्रांच्या बाजूने असून त्यांना मूलभूत सुविधादेखील मिळाल्या पाहिजेत. शासन ग्रामस्थांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय घेईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. आज संघर्ष समिती आणि युवा मोर्चा तसेच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करू. त्यानंतर या प्रकरणी जलदगतीने सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.