बदलत्या सत्ता समिकरणानुसार भाजपकडे असलेले अपक्ष आमदारही दूर जाण्याची शक्यता

मुबई, : महाराष्ट्रात सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवल्याने या नाट्यात ट्विस्ट निर्माण झाला असून सत्तेची नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्तेपासून दूर चाललेल्या भाजपला आणखी एक धक्का बसू शकतो. सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. मात्र सत्तेची समिकरणे बदलू लागताच भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरू केल्याची माहिती आहे.

अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रित म्हणजे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

सर्वसाधारणपणे अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतात. आता राज्यात सत्तेचं समीकरणच बदलत असल्याने आधी पाठिंबा दिलेले आमदारही भाजपला धक्का देत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता अपक्ष आमदार भाजपची साथ सोडून इतर पक्षात जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.