सर्व बँक खाती गोठविल्याने ‘अ‍ॅमनेस्टी’ने गाशा गुंडाळला

bank accounts frozen, Amnesty closed its doors

नवी दिल्ली :- मानवी हक्कांच्या रक्षणासाठी जगभरात काम करणाऱ्या ‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल’ (Amnesty International) या स्वयंसेवी संस्थेच्या भारतातील कार्यालयाची सर्व बँक खाती (Bank Account) भारत सरकारने गोठविल्याने संस्थेने भारतात आपला गाशा गुंडाळला असून सर्व कर्मचाऱ्यांना घरी पाठविले आहे. काळा पैसा पांढरा करण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणि परकीय देणग्यांचे नियमन करणारा कायदा यांचे कथित उल्लंघन केल्याच्या आरोपावरून भारत सरकारने ही कारवाई केली आहे.

‘अ‍ॅमनेस्टी’ने मात्र या आरोपांचा ठामपणे इन्कार केला असून सरकारने ही कारवाई सुडाने केल्याचा आरोप केला आहे. ‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल-इंडिया’चे कार्यकारी संचालक अविनाश कुमार माध्यमांसाठी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले की, भारत सरकार आणि त्यांच्या तपासी यंत्रणांनी गेली दोन वर्षे आमच्यामागे ससेमिरा लावणे आणि आमची बँक खाती गोठविणे हे काही अपघाताने घडलेले नाही. आम्ही डिसेंबरमधील दिल्लीत दंगलीत व जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांचा विषय नेटाने लावून धरला याच्या रागापोटी आणि आमचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने ही करवाई केली आहे.

कोणताही सबळ पुरावा नसताना अंमलबजावणी संचालनालय व केंद्रीय गुप्तचर विभागाने गेल्या दोन वर्षांत आमच्या कार्यालयांवर धाडी टाकून आम्हाला निष्कारण त्रास दिला, असाही संस्थेचा दावा आहे.आम्हाला मिळणारा सर्व पैसा फक्त भारतातून स्वेच्छेने मिळणाऱ्या  देणग्यांच्या रूपाने मिळतो. त्यामुळे आम्हाला परकीय देणग्यांसंबंधीचा कायदा लागू होण्याचा किंवा त्याचे आम्ही उल्लंघन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून अविनाश कुमार यांचे निवेदन म्हणते की, गेल्या आठ वर्षांत आम्ही केलेल्या कामाला  ४० लाखांहून अधिक भारतीय नागरिकांनी समर्थन दिले आहे व त्यापैकी सुमारे एक लाख लोकांनी देणग्या दिल्या आहेत. देशातून मिळालेल्या या देणग्या परदेशातून मिळाल्याचा जावईशोध करून सरकार ‘पराचा कावळा’ करत आहे.

ही बातमी पण वाचा : FRDI -बिल 2017 : बॅंक आर्थिक अडचणीत असल्यास बुडणाऱ्या बँकांना थेट खातेधारकांचा पैसा वापरता येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER