” बुद्धी VS वृत्ती ! “

Wisdom VS attitude

या देवी सर्वभूतेषु बुद्धीरुपेण संस्थिता , नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ! सध्या सर्वत्र सुरू असलेल्या नवरात्रात प्रत्येक जण आपल्या देवतेचे पूजन ,जागर, भक्ती ,आरती या विविध मार्गांनी करत आहेत . त्यातून आपल्याला जाणवतं की ही सगळ्या स्त्रीशक्तीची पूजा आहे. मातृ देवतेची पूजा आहे. प्रचंड ऊर्जेचे प्रतीक असणाऱ्या शक्तीच गुणगान आहे.

ही आराधना स्त्री आणि पुरुष दोघही तितक्याच भक्तिभावाने करतात आहेत . पण वास्तवता काय सांगते ? मुळातच स्त्री आणि पुरुष या दोन आदीम शक्तींच्या ऊर्जांच्या समतोलावर, मानवजातीचा समतोल अवलंबून असतो .कुटुंब व्यवस्थेचाच नाही तर समाजाचाही डोलारा अवलंबून असतो. त्यांची बलस्थाने वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आणि परस्परपूरक असतात.

स्त्री सहनशील ,तर पुरुष कणखर,- तिच्याकडे स्वीकाराची ताकद -तर त्याच्याकडे संरक्षणाची ताकद, स्त्री सृजनशील -तर पुरुष धैर्यवान, तिचं एक रूप क्षमा -तर त्याचं शिस्त ,ती वात्सल्यमूर्ती- तर तो अजिंक्य योद्धा यांच्या समतोलातूनच मानवाचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असतं.

मुख्य म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनी हे परस्परांचे गुण सहवासाने परस्परांमध्ये रुजवून घ्यावे असे ही अपेक्षित असते. काही प्रमाणात आज हे घडलेले देखील आहे. बाळाला सांभाळणारा मायाळू पिता आणि कामाच्या ठिकाणी हाताखालच्या लोकांना क्षमाशीलतेने सांभाळून घेणारा बॉस दिसून येतात. पण याचं प्रमाण फार कमी. मात्र स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख काळाच्या ओघात बघितला तर फार फार वरच्या दिशेने जातांना दिसतो. स्त्री शक्ती जागृत झाल्याचं हे प्रतीक आहे. शिक्षणाची दारे उघडून तिने आपला विकास करून घ्यायला सुरुवात केली ,अतिशय आत्मविश्वासाने ती सगळ्या क्षेत्रात पोहोचलेली ही दिसते आहे. म्हणजे श्री देवीसूक्तम यातील रूपान प्रमाणे तिने आता बुद्धीरूपही, इतर रुपे छाया,शक्ती ,चेतना, शांती ,लज्जा ,कांती आणि इतर रुपान सहित धारण केलेले आहे. मुळातच ही स्त्रीरूपी देवता निद्रा ,तृष्णा ,क्षुधा आणि सगळ्याच जगाला व्यापणारी आहे यात शंकाच नाही.

पण ही बुद्धी ,ही कर्तबगारी मिळवताना, प्रत्येकालाच आणखीन जे मिळवायची आवश्यकता असते, तो म्हणजे आनंद! अगदी आबालवृद्धांना आपापल्या वयोमानानुसार आनंद हवा असतो . प्रत्येकजण आपल्याला हवा असणाऱ्या आनंदाच्या शोधात असतो.( मला याठिकाणी सुखाच्या शोधात म्हणायचं नाही आहे ,सुखी माणसाचा सदरा मुळी नसतोच.) पण आनंदाच अस्तित्व असतं हे नक्की!

तो “खराखुरा आनंद” मिळवला आहे का तिने? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येईल. कारण अजूनही तो तिने इतरांवर अवलंबून ठेवला आहे. तिला समाज ,कुटुंबीय कसे वागवतात ? तिच्याकडे कसे बघतात ?यावर ते अवलंबून आहे .शिक्षित, कमावती असूनही ती परावलंबी आहे. निर्णय घेऊ शकत नाही. मत मांडू शकत नाही .कारण मुळात ती आपले मत तयारच करू शकत नाही. मनातील चलबिचल, तिला काय हवं काय नको हे विचारल्या जात नाही. पण ती स्वतः ही स्वतःला हा प्रश्न कधीच विचारत नाही.

हा आत्मसन्मान ,हा आनंद जर नसेल , तर स्त्री म्हणजे आनंद स्त्रोत, तोच नष्ट होऊन कुटुंब आणि समाज यावरही परिणाम होणारच ! मी स्वतः कशी आहे ? याचाही विचार ती इतरांच्या ठरवण्यावरून च ठरवते.

उदाहरणार्थ :मला कॉन्सर्ट किंवा मोठी संगीत मैफल ऐकायची आहे. किंवा पुण्याचे सवाईगंधर्व ऐकायचे आहे. फार मोठी गोष्ट नाही ही ! पण ती मैफल मला ऐकायची आहे, हेच मुळी मला स्वतःला कळत नाही कधीकधी ! कारण मी हा प्रश्न मला कधी विचारलाच नाही की तुला नेमकं काय हवंय ? सवाई गंधर्व ची तिकीट बऱ्याच जणांनी घेतलेली कळतात .पण त्याच वेळी नेमके काहीतरी चिल्लर काम निघत आणि तीच माझी प्रायोरिटी समजून मी तो समारोह बघणे पुढच्या वर्षी ढकलते.

कारण याला तीन गोष्टी जबाबदार होतात .१) मी घरी नसले तर बरेचदा काहीच अडत नसते, आणि ही भावना मला आवडणारी नसते. २) तसेच हा समारोह मला एकटीने बघायचा नसतो तर माझ्या प्रिय व्यक्तीबरोबर बघायचा असतो, तो येणार नसेल वा त्याला वेळ नसेल तर मीही तो ध्यास सोडून देते ३) तिसरी गोष्ट अशी की सगळे एंजॉय करताना बघून मला तो एन्जॉय करावासा वाटतो, पण मला खरंच तो ऐकायचा आहे का ? आवडणार आहे का ? याचा मी विचारच केलेला नसतो..!

एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये जर स्त्री विचार करू शकत नसेल ,आणि इतके जर – तर असतील तर मी खरंच बुद्धिमान झाले का ? स्वतंत्र झाले का ? खर्‍या अर्थाने सुशिक्षित झाले का ? हा प्रश्नच आहे.

बुद्धी प्रश्न सोडवते ,पण तसेच ती बरेच प्रश्न समस्या निर्माणही करते. बुद्धीने कार्यक्षमता ,क्षमता वाढतात पण अहंकाराचे ही पोषण होऊन माणसाला एकटा पडण्याची शक्यता ही बुद्धीच्या विकासा मागे असते. अनेक अभ्यासक्रम ,अभ्यास ,विद्यापीठातून होतीलही पण जीवन सूत्र समजतीलच असे नाही. जीवन परिपूर्ण असले तरी ,परिपूर्ण जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी ,आनंद मिळवण्यासाठी, वृत्ती आणि दृष्टीकोन देखील विकसित व्हायला हवा असतो!

आपली वृत्ती आणि दृष्टिकोन (अटीट्युड अँड पर्स्पेक्टिव्ह) हे आपल्या वर्षानुवर्षांच्या beliefs वर अवलंबून असतात. अनेक वर्षांपासून आपल्या मनाचे जे प्रोग्रामिंग होते त्यावर ते अवलंबून असतात. पण म्हणून ते कधीही पुसले न जाणाऱ्या शिलालेखासारखे नसतात. जाणीव जागृती आणि सजगता (awareness and acceptance) याने त्यात बदल होऊ शकतो.

एकूणच मानवाची अर्थपूर्ण आनंदी होण्याची धडपड अखंड चालू असते .परंतु बुद्धीच्या मार्गाने वैज्ञानिक ,भौतिक, प्रगती करून केवळ वैयक्तिक जीवनातील ,वाढती अशांतता ,,तणावग्रस्तता, त्यातून येणारे वैफल्य वाढते आहे.कौटुंबिक जीवनात कमी होत चाललेली परस्पर सहकार्याची, सामंजस्याची व आदराची भावना समाजजीवनाला ही सर्वांगीण विकासापासून परावृत्त करते. व्यवसायिक जीवनातील काहीही करून जिंकण्याची भावना माणुसकी पासून दूर नेत नाही का ? हा खरंच एकांकी बुद्धीच्या वाढीचा परिपाक आणि पराभव आहे.

फ्रेंड्स ! हीच वेळ आहे आपल्या मनाची उत्तम देखभाल करण्याची ! श्री देवीच्या विविध रूपात स्वतःला शोधण्याची किंवा विविध रूपे स्वतः त रुजवण्याची ! मला एक प्रार्थना नेहमीच मोह घालते. हे देवा जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची शक्ती /सामर्थ्य मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो /शकते ती बदलण्याचे धैर्य मला दे आणि आणि महत्त्वाचा भाग म्हणजे या “दोघांमधील फरक जाणण्याचे “शहाणपण” तू मला दे.” यातील शहाणपण हा शब्द यावेळी मला येथे महत्त्वाचा वाटतो. कारण बुद्धिमान माणसाला शहाणपण येईलच असे नाही. शहाणपणा मुळे समस्या परत परत कशा निर्माण होणार नाही हे ठरवता येतं. आपली कार्यक्षमता योग्य हेतूसाठी कशी वापरायची हे लक्षात येतं. यामुळे कृतज्ञता विकसित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी संपूर्ण जीवन हेच गुरु स्थान असतं, त्यामुळे स्वतःवर, जगण्यावर प्रेम करत होणारा विकास जीवनसूत्र शिकवतो आणि यातूनच सर्वांगपरिपूर्ण व्यक्तिमत्व उमलून येत ! हे सगळं केवळ बुद्धीच्या विकासाने शक्य होत नाही ,तर त्यासाठी वृत्ती ची (attitude and पर्स्पेक्टिव्ह) आवश्यकता ,जोड हवी असते, म्हणूनच सर्व मित्र-मैत्रिणींना सांगावसं वाटतं की,”या देवी सर्वभूतेषु वृत्ती रूपेण संस्थिता , नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः “या रूपातील देवतेचे ही स्मरण करायला विसरू नका.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER