विम्बल्डन होणार नसली तरी खेळाडूंना बक्षीस रक्कम मिळणार

Wimbledon

टेनिसची सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा, विम्बल्डनच्या आयोजकांनी मोठा निर्णय घेतला आहे. यंदा कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नसली तरी त्यांनी या स्पर्धेत सहभागी झाले असते अशा सर्व खेळाडूंना बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. विम्बल्डनचे आयोजक आॅल इंग्लंड क्लबने घेतलेल्या या निर्णयाचे टेनिस विश्वातील असंख्य खेळाडूंनी स्वागत केले आहे कारण या निर्णयाचा टेनिसच्या क्रमवारीतील खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंना मोठा आधार होणार आहे.

विम्बल्डन आयोजकांनी या स्पर्धेचा विमा काढलेला होता. कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करावी लागल्याने त्यांना ही विम्याची रक्कम मिळणार आहे. त्यातून त्यांनी खेळाडूंसाठी हा दिलाशाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आॅल इंग्लंड क्लब एकूण ६२० खेळाडूंमध्ये १ कोटी स्टर्लिंग पौंड (१ कोटी २५ लाख डॉलर) एवढी रक्कम वाटणार आहे.

आॅल इंग्लंड क्लबने घेतलेल्या निर्णयानुसार पात्रता फेरीत खेळले असते अशा २२४ खेळाडूंना प्रत्येकी १२ हजार ५०० पौंड, एकेरीच्या मेन ड्रॉमध्ये खेळले असते अशा २५६ खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार पौड, दुहेरीच्या मेन ड्रॉमधील १२० खेळाडूंना प्रत्येकी ६२५० पौंड, व्हिलचेअर गटातील १६ खेळाडूंना प्रत्येकी ६ हजार पौंड आणि क्वाड व्हिलचेअर प्रकारातील चार खेळाडूंना ते प्रत्येकी ५ हजार पौंङ रक्कम देणार आहेत. खेळाडूंना कोणत्याही एकाच स्पर्धेची रक्कम मिळेल असे क्लबने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER