विम्बल्डनचा मोठा निर्णय, सिडींगची पध्दत बदलणार

All England Club

टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा विम्बल्डनचे आयोजक आपल्या कठोर परंपरा व कडक नियमांसाठी प्रसिध्द आहेत. अजुनही ते खेळाडूंना पांढऱ्या पोशाखाची सक्ती करतात, मैदानाभोवती जाहिराती ते लावत नाहीत, गडद हिरव्या रंगावर त्यांचे प्रेम कायम आहे, पुरुष व महिला खेळाडूंना समान बक्षीस रकमेचा बदल त्यांनी सर्वात उशिरा स्विकारला आणि खेळाडूंना मानांकन (सिडिंग) देण्याची त्यांची स्वतंत्र पध्दत आहे. असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) व वुमेन्स टेनिस असोसिएशन (डब्ल्यू टीए) च्या क्रमवारीला ते महत्त्व देत नव्हते पण आता विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड क्लबने मोठा निर्णय घेत बदल स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे.

ही बातमी पण वाचा : विम्बल्डन होणार नसली तरी खेळाडूंना बक्षीस रक्कम मिळणार

पुरुष एकेरीसाठी आपल्या पारंपरिक सिडींग पध्दतीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पुढील वर्षापासून पुरुष एकेरीसाठी सिडिंग देताना इतर ग्रँड स्लॅम स्पर्धांप्रमाणेच एटीपी क्रमवारीचाच निकष लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आतापर्यंत विम्बल्डनसाठी सिडींग देताना जागतिक क्रमवारीतील स्थानासोबतच त्या खेळाडूच्या ग्रास कोर्टवरील कामगिरीला महत्त्व देण्यात येत होते. विम्बल्डनच्या या स्वतंत्र पध्दतीवर बऱ्याच खेळाडूंनी वेळोवेळी नाराजीसुध्दा व्यक्त केली आहे. पण आता विम्बल्डनने सर्वांसोबत चालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्यातरी फक्त पुरुष एकेरीसाठीच ते हा बदल करणार आहेत.

विम्बल्डनने 2002 पासून अंगिकारलेल्या सिडींग पध्दतीनुसार खेळाडूंच्या आधीच्या दोन वर्षातील ग्रासकोर्टवरील कामगिरीला अधिक महत्त्व देण्यात येत होते. मात्र आताची स्पर्धा व आधुनिक ग्रास कोर्ट पाहता ही पध्दती आता कालबाह्य झाल्याचे आॕल इंग्लंड क्लबने आपल्या नियोजनात म्हटले आहे.

गेल्या वर्षी रॉजर फेडरर क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आणि राफेल नदाल दुसऱ्या स्थानी होता. पण विम्बल्डनने ग्रास कोर्टवरील कामगिरीला महत्त्व देत फेडररला दुसरे आणि नदालला तिसरे सिडींग दिले होते आणि त्यामुळे नदालला अतिशय खडतर ड्रॉ मध्ये स्थान मिळाले होते. ग्रास कोर्टवर होणाऱ्या स्पर्धांची संख्या कमी असल्याचे कारण विम्बल्डनचे आयोजक द्यायचे. म्हणून ते एटीपी क्रमवारीतील गूण अधिक गेल्या 12 महिन्यांतील ग्रास कोर्ट स्पर्धांत कमावलेले गूण अधिक त्याच्याआधीच्या 12 महिन्यात ग्रास कोर्टवरील स्पर्धांत कमावलेले 75 गुण असे एकत्र करुन मानांकन द्यायचे. यातील दोन वर्षांच्या ग्रास कोर्टवरील कामगिरीच्या निकषाला बहुतेकांचा आक्षेप होता.

विम्बल्डनच्या या ग्रास कोर्टवरील कामगिरीला प्राधान्याच्या पध्दतीनेच गेल्यावर्षी सेरेना क्रमवारीत 183 व्या स्थानी असताना तिला 25 वे सिडींग, देण्यात आले होते.

दरम्यान, विम्बल्डनने यंदा स्पर्धा होणार नसली तरी खेळाडूंना बक्षीस रक्कम देण्याच्या निर्णयाचा भारताचे प्रज्नेश गुनेश्वरन व अंकिता रैना यांना फायदा होणार आहे. हे दोघे पात्रता स्पर्धेत खेळले असते. त्यांनी प्रत्येकी 12 हजार 500 स्टर्लिंग पौंडचा लाभ होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER