कोरोनामुळे आता विम्बल्डनसुद्धा रद्द

२०२१ मध्ये होणार आयोजन

Wimbledon cancelled this year

लंडन :- कोरोनामुळे ऑलिम्पिकसह सर्व प्रमुख क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले असताना आता टेनिसमधील सर्वांत प्रतिष्ठेची विम्बल्डन टेनिस स्पर्धासुद्धा रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही स्पर्धा रद्द करावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने तातडीने बोलावलेल्या बैठकीनंतर बुधवारी हा निर्णय जाहीर केला. नियोजनानुसार यंदा ही स्पर्धा २९ जून ते १२ जुलै दरम्यान होणार होती. आता ही स्पर्धा थेट २०२१ मध्ये होणार असून त्यावेळी तारखा २८ जून ते ११ जुलै असणार आहेत.

टेनिसमधील ही सर्वांत जुनी स्पर्धा असून १८७७ पासून ती खेळली जात आहे. पहिल्या विश्वयुद्धामुळे १९१५ ते १९१८ दरम्यान आणि दुसऱ्या विश्वयुद्धामुळे १९४० ते ४५ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते.

यासोबतच जागतिक टेनिसच्या एटीपी व डब्ल्यूटीए या संघटनांनी त्यांच्या ग्रासकोर्टवरील इतर स्पर्धासुद्धा रद्द केल्या आहेत. विम्बल्डन आता थेट पुढच्याच वर्षी होणार असली तरी दरवर्षी त्या आधी मे महिन्यात होणारी फ्रेंच ओपन स्पर्धा आयोजकांनी सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलली आहे. न्यूयॉर्क येथे खेळली जाणारी यूएस ओपन स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान खेळली जाणार आहे.


Web Title : Wimbledon also canceled due to Corona

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)