विम्बल्डन रद्द करणे हा ठरला फायद्याचाच सौदा!

wimbledon cancellation is profitable deal

लंडन : टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा ‘विम्बल्डन’ यंदा कोरोनाच्या प्रकोपामुळे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाने विम्बल्डनच्या आयोजकांचे फार मोठे नुकसान झाले असेल, असा तुमचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. उलट या निर्णयाने त्यांचा फायदाच झाला आहे.

आता हे कसे काय तर विम्बल्डनचे आयोजक आॕल इंग्लंड लाॕन टेनिस क्लबने या स्पर्धेचा विमा उतरवलेला होता. हा विमा त्यांनी 20 लाख डाॕलर मोजून काढला होता आणि आता यंदाची स्पर्धा रद्द झाल्याने विम्बल्डन आयोजकांना किती भरपाई मिळणार आहे…माहित्येय? नसेल माहिती तर वाचा…तब्बल 1410 लाख अमेरिकन डॉलर. गणित पहा 20 लाखाचे मिळणार 1410 लाख अमेरिकन डाॕलर. म्हणजे तब्बल 70 पटीपेक्षाही अधिक रक्कम आॕल इंग्लंड लाॕन टेनिस क्लबला मिळणार आहे.

गेल्या 17 वर्षांपासून ते हा विमा काढताहेत. प्रतीवर्षी 20 लाख अमेरिकन डॉलर या हिशेबाने झाले 340 लाख डॉलर तरीसुध्दा त्यांना मिळणार आहेत 1410 लाख अमेरिकन डॉलर. तरी विम्बल्डन आयोजकांना हा फायद्याचाच सौदा राहिला आहे.

आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आॕल इंग्लंड लाॕन टेनिस क्लबने ही स्पर्धा पुढे ढकलली असती तर त्यांना विम्याचा काहीच लाभ झाला नसता पण त्यांनी ही स्पर्धा थेट रद्दच केली आहे त्यामुळे त्यांना हा लाभ होणार आहे.

विम्बल्डनच्या आधी होणारी फ्रेंच ओपन स्पर्धा आयोजकांनी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली पण विम्बल्डन स्पर्धा मात्र थेट रद्दच करण्यात आली यामागचे कारण हा विमा तर नसावा ना?