विलीस, ब्रेट ली, मोर्केल यांच्यात काय आहे साम्य?

अलीकडेच निधन झालेले इंग्लंडचे जलद गोलंदाज बॉब विलीस यांच्या नावावरच्या विक्रमांपैकी एक विक्रम थोडा वेगळा होता. तो म्हणजे कसोटी सामन्यात एकदाही 10 किंवा 10 च्या वर बळी न घेता सर्वाधिक कसोटी बळी आपल्या नावावर करण्याचा. विलीस यांनी 90 कसोटी सामन्यात 325 बळी मिळवले पण सामन्यात 10 बळी अशी कामगिरी एकदाही नव्हती.

त्यांची सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजीचे विश्लेषण 92 धावात 9 बळी असे होते, तर डावातील सर्वोत्तम गोलंदाजी 43 धावात 8 बळींची होती. 1981 च्या हेडींग्ले कसोटीत आॕस्ट्रेलियाविरुध्द दुसऱ्या डावात त्यांनी हे आठ बळी मिळवले होते पण त्याच सामन्याच्या पहिल्या डावात 72 धावा मोजूनही त्यांना एकसुध्दा गडी बाद करता आला नव्हता.

कसोटी क्रिकेटमध्ये बॉब विलीस यांच्यासह 13 असे गोलंदाज आहेत ज्यांनी दोनशेच्यावर बळी मिळवले आहेत पण सामन्यात 10 बळी एकदाही मिळवू शकलेले नाहीत.हे 13 गोलंदाज असे..

गोलंदाज—– सामने—–बळी—सर्वोत्तम
बॉब विलीस—- 90 ——325 —- 9/92
ब्रेट ली ———- 76—— 310 —- 9/171
मोर्ने मोर्केल —- 86—— 309 —-9/110
जेकस् कॕलीस- 166——292 —-9/92
जोएल गार्नर — 58—— 259 —-9/108
जेसन गिलेस्पी – 71—— 259 —-9/80
गॕरी सोबर्स —— 93—— 235 —-8/80
डैरेन गॉघ ——- 58—— 229 —-9/92
रे लिंडवाल —– 61—— 228 —-9/70
अँड्र्यु फ्लिंटॉफ- 79—— 226 —-8/156
पीटर सिडल —–67—— 221 —-9/104
हिथ स्ट्रिक ——-65 —— 216 —-9/72
जेफ थॉमसन—- 51—— 200 —-9/105

याच अनुषंगाने विलीस यांचा आणखी एक विश्वविक्रम असा आहे की सामन्यात 10 बळी न मिळवू शकणाऱ्या गोलंदाजांमध्ये डावात पाच बळी मिळविण्याची कामगिरी मात्र त्यांनी सर्वाधिक 16 वेळा केली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांनी डावात पाच किंवा अधिक बळी तर 16 वेळा मिळवले पण सामन्यात 10 बळी एकदासुध्दा नाही.

असे केवळ पाचच गोलंदाज आहेत की, ज्यांनी डावात पाच किंवा अधिक बळी 10 पेक्षा अधिक वेळा मिळवले आहेत पण सामन्यात 10 बळी ते मिळवू शकलेले नाहीत.हे गोलंदाज असे…

गोलंदाज ———– बळी—– डावात 5 बळी
बॉब विलीस ——- 325 — 16
रे लिंडवाल ——– 228 — 12
फिडेल एडवर्डस् – 165 — 12
ब्रेट ली ————- 310 — 10
डॕनी मॉरिसन —– 160 — 10