‘तुम्ही तिच्याशी लग्न कराल का?’ सरन्यायाधीशांचा ‘पॉक्सो’आरोपीला प्रश्न

Sharad Bobde - POCSO Act

नवी दिल्ली : ‘तुम्ही तिच्याशी लग्न करायला तयार आहात का?’, अशी विचारणा सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे (Sharad Bobde) यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO Act) बलात्काराचा आरोप असलेल्या महाराष्ट्रातील एका आरोपीला केली. थोडा विचार करून आरोपीने नकारार्थी उत्तर दिल्यावर न्यायालयाने त्याच्या संभाव्य अटकेला दोन महिने स्थगिती देऊन त्याला दरम्यानच्या काळात नियमित जामिनासाठी सक्षम न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पारधीवाडयात महादेवाच्या मंदिराजवळ राहणार्‍या मोहित सुभाष चव्हाण आरोपीच्या वकिलाला सरन्यायाधीशांनी वरील प्रश्न विचारला. त्यावर वकिलाने, मी (आरोपीला) विचारून सांगतो, असे उत्तर दिले.

सरन्यायाधीश त्या वकिलास म्हणाले, तुम्ही (तुमच्या अशिलाने) त्या तरुण मुलीला नादी लावून तिच्यावर बलात्कार करण्याआधी विचार करायला हवा होता. तुम्ही सरकारी नोकरीत आहात याचीही तुम्हाला कल्पना होती. तुम्ही त्या मुलीशी (पाडितेशी) लग्न करावेच, असा आमचा आग्रह नाही. केवळ माहिती करून घेण्यासाठी आम्ही विचारत आहोत.

वकिलाने थोडा वेळ मागून घेतला व बहुधा तेवढ्या वेळात त्यांनी आरोपी मोहित याच्याशी मोबाईलवरून सरन्यायाधीशाच्या प्रश्नासंबंधी माहिती घेतली. थोडया वेळाने पुन्हा कोर्टापुढे येऊन वकिलाने आरोपी मोहितच्या वतीने सांगितले की, आधी माझी लग्न करण्याची तयारी होती. पण तिने नकार दिला. आता माझे लग्न झाले असल्याने मी तिच्याशी लग्न करू शकत नाही. खटला सुरु आहे, पण अद्याप आरोप निश्चित व्हायचे आहेत.

जळगाव येथील ‘पॉक्सो’ विशेष न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन १३ महिन्यांनंतर रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाविरुद्ध आरोपी मोहित याने ही विशेष अनुमती याचिका (Special Leave Petition-SLP) केली होती. आरोपीचा हा नकार ऐकल्यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आपण उत्सूक नसल्याचे सांगून याचिका मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार याचिका मागे घेण्यात आली. मात्र ओरोपी मोहितला सक्षम न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज करता यावा यासाठी त्याच्या संभाव्य अटकेस आठ आठवडे स्थगिती दिली गेली. विशेष म्हणजे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश न्या. मंगेश पाटील यांनीही हाच प्रश्न युक्तिवाद पूर्ण झाल्यावर मोहितला विचारला होता. त्याच्याकडून नकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्यांनी मोहितचा अटकपूर्व जामीन रद्द करम्याचा निकाल दिला होता.

या प्रकरणातील आरोपी मोहित २४ वर्षांचा असून महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीत (महाजेनको) तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. अटक होऊन ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिला तर त्याला नोकरीतूनही आपोआप निलंबित केले जाईल. हे टाळण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.

लांबच्या नात्यात असलेल्या एका मुलीवर ती १६ वर्षांची असताना अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल मोहित याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलीने प्रत्यक्ष घटनेनंतर सुमारे दोन वर्षांनी पोलिसांत फिर्याद नोंदविली. त्या फिर्यादीनुसार त्याआधी आरोपीच्या आईने या मुलीला मी सून म्हणून स्वीकारेन, पण माझ्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार करू नका, अशी गळ घातली होती. एवढेच नव्हे तर ही मुलगी सज्ञान झाली की तिचे तुझ्याशी लग्न लावून देईन, असे मोहितने या मुलीच्या आईकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER