आपणही सजग होणार का?

Vivek Velankar - Maharashtra Today

Shailendra Paranjapeमहापालिकांचा कारभार नियोजनबद्ध असावा, ही सामान्य करदात्याची अपेक्षा असली तर त्यात काहीही गैर नाही. अशी नकारात्मक सुरुवात करण्याचं कारण म्हणजे निर्बंध थोडे शिथिल करून दुकानं आणि सार्वजनिक व्यवहार सकाळी ७ ते ११ ऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ असे करण्यत आले आणि पुणेकरांनी रस्त्यारस्त्यांवर क्षणात कोंडी करून दाखवण्याचे कौशल्य दाखवून दिले. मुळात पुण्याच्या विविध रस्त्यांवर दिसून आलेली कोंडी ही प्रामुख्याने सुरू केलेली पावसाळापूर्व रस्त्यांची कामे या कारणामुळे होती.

पावसामुळे हिंदी चित्रपटात चिखलात लडबडून मारामारी करणारे हिरो-व्हिलन हे दृश्य डोळ्यासमोर आणा. तशा चिखलात, राड्यात लोक कसाबसा मार्ग काढत होते. त्यातून दुचाक्या दामटत होते. जरा शिथिल केलं गेलं की करा गर्दी, होऊ द्या झुंबड, अशा पद्धतीनं लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. अर्थात अर्थकारण पुन्हा पूर्ववत त्या मानाने वेगाने होऊ शकेल, हेही त्यातून दिसून येत आहे. पण अचानक इतकी गर्दी होणं, करणं योग्य नाही.

महापालिकांचा कारभार नियोजनबद्ध असतो. त्यामध्ये वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने फूटपाथ, रस्तेदुरुस्ती, गटारे सांडपाणी व्यवस्था देखभाल यांचं एक वेळापत्रक तयार झालेलं असतं. त्यानुसार दरवर्षी ती ती डिपार्टमेंट्स कामाला लागतात आणि महापालिकेचं चक्र सुरू राहतं. यंदा पावसाळापूर्व कामांना मुळात सुरू करायलाच उशीर झालेला आहे. त्याबद्दल १५ दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी टीका करून ही कामं यंदा उशिरा झाल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. त्यावेळी महापौरांनी कामं उशिरा झाली आहेत; पण ती पूर्ण करू, असं सांगतानाच विरोधी नेते बैठकीत काही बोलत नाहीत आणि बाहेर प्रेसला जाऊन विरोधात विधानं करतात, अशी तक्रार मांडली होती. वास्तविक कारभार करणं, हे काम सत्तारूढ पक्षाचं आणि सकारात्मक विरोध करणं, हे काम विरोधकांचं. त्यामुळे महापौरांच्या तक्रारीला काहीही अर्थ नव्हता, हे कालपरवाच्या वाहतूक राड्यानंतर स्पष्ट झालंय.

एकीकडे कोरोनाशी लढतानाच सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सारं काही आलबेल नाही, हेही पुन्हा लोकांसमोर आलं आहे. हेही एक कारण कामे उशिरा होण्यामागे असू शकेल. कारण महापौरांनी आणि प्रशासनानं कामं १० जूनपर्यंत पूर्ण करू, असं आश्वासन दिलं आहे. पुण्यात नागरी प्रश्नांवर आवाज उठवणारी ‘सजग नागरिक मंच’ नावाची खरोखर सजग संघटना आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या दिरंगाईचे आणि काम करताना पाळल्या न गेलेल्या निकषांकडे लक्ष वेधले आहे.

रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात चार वर्षांपूर्वीचे आयुक्त कुणाल कुमार यांनी नियमावली तयार केली होती. पण सध्या पुण्यात रस्त्यांची कामं बघितली तर ही नियमावली पायदळीच तुडवल्याची टीका वेलणकर यांनी केली आहे. रस्ता खणताना त्याची माहिती देणारे फलक लावणे तसेच बॅरिकेट्स लावणे आणि वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने रस्ता खोदणे, हे नियमावलीत समाविष्ट होते. पण पुण्यात सध्या ठिकठिकाणी झालेली कोंडी आणि खोदकामे बघता हे सारे नियम धाब्यावर बसवले गेलेले आहेत, असे वेलणकर यांनी निदर्शनास आणून दिले.

रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना शास्त्रीय पद्धतीनं कामं करण्याचे आदेश दिले जावेत. पावसाळ्यात रस्ते उखडले गेले तर संबंधित अधिकाऱ्याकडून दुरुस्तीचा खर्च वसूल केला जावा, अशी मागणीही वेलणकर यांनी केलीय. पावसाळी गटारांची ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलणे आवश्यक होते आणि ते काम हाती घेण्यात आलंय. पण शिथिलीकरणामुळे अचानक गर्दी झाली आणि लोकांना त्रास झाला. ही कामे १० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं महापालिकेतील bसभागृह नेते गणेश बिडकर यांनी आश्वासन दिलंय.

कोणत्याही कामात दिरंगाई झाली किंवा गडबड झाली तर ते तातडीने निदर्शनास आणून त्या त्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या खिशातून पैसे वसूल होतील, हे पाहण्याइतकी दक्ष जनता झाली तर भ्रष्टाचार खूप प्रमाणात कमी होऊ शकेल. वेलणकर यांनी अनेक वेळा हे केलंय. आपणही करायला हवं.

शैलेंद्र परांजपे

Discalimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button