‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना विधानसभेसाठी एकत्र आणणार- थोरात

Balasaheb Thorat

पुणे : सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत . लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने विधानसभेसाठी पक्षाने कंबर कसली आहे . त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार असल्याचे काँग्रेस नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा:- विरोधी पक्ष मनसेलाचं नाही, तर ट्रम्प यांनाही सोबत घेतील : संजय राऊत 

संविधानाचा आदर करणाऱ्या पक्षांना आम्ही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत . धर्मनिरपेक्षतेला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात जे कोणी आवाज उचलतील त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू , असेही थोरात म्हणाले .

लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नाही. त्याच्या परिणामस्वरूप आम्हाला नऊ जागा गमवाव्या लागल्या आहेत . त्यामुळे विधानसभेसाठी आम्हाला ‘वंचित’ची साथ हवी असून त्यासाठी आम्ही आंबेडकरांशी चर्चाही करू , अशी माहिती थोरात यांनी दिली .

विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय यायला अजून वेळ लागणार आहे; कारण आघाडीत येणाऱ्या इतर सहकारी पक्षांनाही काही जागा द्याव्या लागणार असल्याचेही ते म्हणाले .

इतकेच नाही तर मनसेबाबत बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, त्यावेळी राज्यात काँग्रेससोबतच्या युतीबाबत चर्चा झाली नव्हती. केवळ ईव्हीएमबाबत चर्चा त्यांनी केली होती. मनसेकडून आघाडीत सामील होण्याबाबत जर प्रस्ताव आला तर आम्ही तो केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवू, असेही थोरात म्हणाले .