सर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का?, मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

Prakash Ambedkar - Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. तसेच राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाबाधित (Corona) रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत सर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का? रुग्ण वाढले की पुन्हा खापर फोडायला सरकार आहेच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात निर्माण केलेल्या विविध आरोग्य सुविधांचे १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तुर्भे येथील राधा स्वामी सत्संग कोव्हिड सेंटरचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप (BJP) आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे (VBA) मंदिरे खुली करण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अनेकदा सरकावर टीकाही केली आहे. त्या आंदोलनाचा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, मागील अनेक महिन्यांपासून राज्य सरकार कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काही शहरात सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे; परंतु आता सर्वच काही बंद ठेवून चालणार नाही. त्याकरिता मिशन बिगिन अगेनच्या नावाखाली आपण हळूहळू काही गोष्टी सुरू करीत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रणात आलेले रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या वाढल्याचे उघड होत आहे.

आपल्याला सर्वकाही सुरू करून जमणार नाही. आपण मिशन बिगेन अगेन म्हणत काही बाबी सुरू करीत आहोत; पण उघडा उघडा बोलणारे पुढची जबाबदारी घेणार आहेत का, असा प्रश्‍न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. जबाबदारीचे काही नाही, रुग्ण वाढले तर सरकार आहेच. खापर फोडायला सरकार आहेच, अशा शब्दांत ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांना सुनावले.

“चेस द व्हायरस” मोहिमेंतर्गत या पुढील काळात प्रत्येकाने अधिक काळजी घेत माझ्यामुळे माझे कुटुंब कोरोना बाधित होता कामा नये. याची काळजी घेऊन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, नियमित हात धुणे, डोळे नाक आणि तोंडाला हात न लावणे, घरात आल्यानंतर लहानपणीच्या सवयीप्रमाणे हातपाय धुणे आणि कपडे बदलणे अशा साध्या साध्या पण महत्वाच्या गोष्टींची स्वयंशिस्त पाळली पाहिजे. यादृष्टीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER