राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा होणार उलथापालथ? सचिन पायलट यांना भेटले आठ आमदार

Sachin Pilot

जयपूर : उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे (Congress) नेते जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांना पक्षात प्रवेश देऊन काल भाजपाने (BJP) काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. जितीन प्रसाद यांच्या भाजपाप्रवेशानंतर आता राजस्थानमधील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पक्षात दीर्घकाळापासून नाराज असलेल्या सचिन पायलट यांच्या गोटात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. पायलट यांच्या गटातील आठ आमदारांनी पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. राजेश पायलट (Rajesh Pilot) यांच्या पुण्यतिथीला ११ जून रोजी सचिन पायलट (Sachin Pilot) शक्तिप्रदर्शन करणार अशी चर्चा आहे.

सचिन पायलट यांचे निकटवर्तीय रामनिवास गावडिया यांच्यासोबत विश्ववेंद्र सिंह, पी.आर. मीणा, मुकेश कुमार यांनी पायलट यांची भेट घेतली. दरम्यान, सचिन पायलट भाजपामध्ये जाणार अशीही चर्चा आहे.

ही बैठक का बोलावण्यात आली याबाबत सध्या तरी काही कळले नाही. मात्र, यात काही महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा नक्कीच झाली असावी, अशी शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सचिन पायलट यांनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर वाटाघाटी समितीकडून १० महिन्यांनंतरही काही निर्णय न झाल्याने पायलट यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर व पक्षाच्या नेतृत्वाबाबतही नाराज असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सचिन पायलट यांच्या गटात हालचालींना वेग आल्यानंतर गहलोत गटही अलर्टवर आला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांनी नुकतीच पायलट समर्थक विश्वेंद्र सिंह आणि पी. आर. मीणा यांच्यासोबत चर्चा केली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गहलोत सरकारमध्ये पायलट गटामधील आमदारांचा समावेश करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button