विधानसभेचे अध्यक्ष खरेच बदलणार का?

Speaker of the Legislative Assembly

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांना नेमायचे आणि आणि त्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्ष करायचे असे घाटत आहे. सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार त्यांना एक पद सोडणे आवश्यक आहे. मात्र पर्याय मिळत नव्हता; आता तो सापडण्याच्या टप्प्यात आहे असे दिसते.

पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले त्याचवेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही त्या पदासाठी जोरदार चर्चा होती. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे काय होणार असा प्रश्न त्यावेळी चर्चेत होता. चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम हे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते मिळाले तर पृथ्वीराजबाबा यांना कुठलीही संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव जोरात असताना विदर्भातील नाना पटोले यांना काँग्रेस श्रेष्ठींनी संधी दिली आणि पृथ्वीराजबाबांना रिकामे बसावे लागले.

केंद्रीय मंत्रिपद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले पृथ्वीराजबाबा हे अतिशय अभ्यासू नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि विधानसभा अध्यक्षपदाची गरिमा ते अतिशय चांगल्या पद्धतीने जपतील आणि वाढवतील असे म्हटले जात होते. मात्र आक्रमक स्वभावाचे नाना पटोले यांनी बाजी मारली.

आता माहिती अशी आहे की पटोले यांनाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई झाली आहे.त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे केले आहे. चव्हाण यांचे दिल्लीतील वजन लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी या प्रस्तावाला होकार देतील असा पटोले यांचा होरा असावा. आपले नाव पटोले यांनी पुढे केले असल्याचे स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी कराडमध्ये सांगितले. त्यामुळे पटोले यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण येणार ही पटोले यांनी पसरवलेली बातमी असल्याचे समोर आले.

पटोले जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नको होते,असे विश्लेषण काही पत्रकारांनी केले होते. त्यामागे काही तर्क देण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा तर्क असा होता की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील राज्य बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशी लावली होती. राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची एकही संधी ते सोडत नसत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदार, मंत्र्यांची कामे मुख्यमंत्री कार्यालयात अडवली जातात अशीही जोरदार चर्चा त्यावेळी होती. पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीला पद्धतशीरपणे खच्ची करतात असे त्यावेळी अनेकदा बोलले गेले. तेच पृथ्वीराज चव्हाण जर विधानसभेचे अध्यक्ष झाले तर राष्ट्रवादीला अडचणीत आणतील का अशी शंका होती.त्यामुळेच त्यांच्या नावाला विरोध झाला असे म्हटले गेले. त्यातच चव्हाण यांच्या निर्णयच न घेण्याच्या पद्धतीवर टीका करताना सरकारला धोरण लकवा झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पवार त्यांना हवे असलेले निर्णय चव्हाण घेत नाही ही त्या तिथे मागील खरी खंत होती म्हणतात. पृथ्वीराजबाबा यांच्याबाबत राष्ट्रवादीच्या मनात जे शंकेचे मोहोळ आहे ते अजूनही तसेच आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेचे अध्यक्ष होण्यापासून त्यांना रोखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभेचे अध्यक्ष कोणाला करायचे हा सर्वस्वी आमच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यात इतर मित्र पक्षांनी लुडबुड करण्याचे कारण नाही अशी खंबीर भूमिका काँग्रेसने घेतली तरच चव्हाण यांना अध्यक्षपद मिळेल. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीला चव्हाण यांच्या तुलनेत नाना पटोले कधीही परवडतात.

सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळूनच सरकार चालवत असून काँग्रेसला विश्वासात घेतले नाही घेतले जात नाही अशी खदखद सुरू आहेच. महाराष्ट्रात आमचा पक्ष निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही अशी खंत खुद्द राहुल गांधी यांनी चार दिवसांपूर्वी व्यक्त केली. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नेत्यांच्या मनात जी खंत आहे तीच एकप्रकारे राहुल गांधी यांनी बोलून दाखवली पण प्रश्न असा आहे की राहुलबाबा एकदा बोलतात आणि मग विषय सोडून देतात. तसे न करता जोपर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानाने वागणूक देत नाही तोपर्यंत त्यांनी दबाव आणत रहावा अशी अपेक्षा आहे.

कोरोनामुळे हतबल झालेल्या देशातील कोट्यवधी नागरिकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राहुल गांधी यांनी स्पीक अप इंडिया हे अभियान राबविले आहे. हे अभियान धरसोडपणाचे आणखी एक उदाहरण ठरले नाही म्हणजे कमावले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER