कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं पुन्हा देशात लॉकडाऊन होईल का?

देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानं गंभीर चित्र निर्माण झालंय. कोरोनाचा नवा विषाणू झपाट्यानं पसरतो. अधिक लोकांना त्याच्यामुळं कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत असला तरी कोरोनातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्या ९० टक्क्यांवर पोहचलीये. या सर्व गडबडीत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल या चर्चेला उत आलाय. राज्यात लॉकडाऊन होऊ शकतं का? राज्यातल्या प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी मुकाबला करायला सज्ज आहेत का त्याचा घेतलेला हा आढावा.

जनसामान्यांच काय आहे मत?

लॉकडाऊन जाहिर करण्याच्या तारखेला काल एक वर्ष पुर्ण झालं. पुर्णपणे बाजारपेठा, उद्योग, व्यवसाय बंद ठेऊन लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता. त्याचे परिणाम दीर्घकाळ दिसत आहेत. आता मात्र या लॉकडाऊनला अनेक स्तरातून विरोध होत आहे. २०२० हे कोरोनाचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी सर्वकाही तात्काळ सुरळीत होईल अशी एकप्रकारची समाजभावना आणि सर्वांच्या मनात तशी इच्छाही होती. लस सापडल्यावर आणि लसीकरण सुरू झाल्यावर त्यात मोठा फरक दिसून येईल असं लोकांना वाटत होतं. मात्र आता लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसीकरणाचा वेग खुप मंद आहे. आतापर्यंत २० टक्के लोकांनाही लस देण्यात आलेली नाहीये.

लॉकडाऊनवर आरोग्य मंत्री म्हणतात

जनतेनं व्यवस्थीत नियमांच पालन करावं. लॉकडाऊनशिवाय आपण कोरोनावर मात करु शकतो. अशी आशा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलीये. ते म्हणाले “गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे हे स्पष्ट आहे, पण लोकांनी स्वयंशिस्त पाळणं अत्यंत आवश्यक आहे, गर्दी टाळलीच पाहिजे. सध्या बेड्स उपलब्ध आहेत, तयारी आहे त्यामुळे अशा स्थितीत लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही,” कोरोनाबद्दल आधी अनिश्चितता होती. नवा विषाणू होता त्याच्याशी कसा संघर्ष करायचा याबद्दल काहीच कल्पना नव्हती आता चित्र स्पष्ट आहे त्यामुळं प्रतिकार करणं सोप्प जाईल असं ही आरोग्यमंत्री टोपे म्हणालेत.

कोरोनाचं फक्त महाराष्ट्रवरच प्रेम आहे का?

राज ठाकरे यांनी “मी मास्क घालत नाही, तुम्ही ही मास्क वापरु नका.” असं विधान माध्यमांसमोर केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी शासनाच्या लॉकडाऊन विषय धोरणावर ताशेरे ओढलेत. संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र सरकारचं अपयश झाकण्यासाठी कोरोनाच वापर होतोय का असा सवाल त्यांनी उपस्थीत केला. ते म्हणाले, “महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे करोना वाढत नाही. करोना च महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच करोना वर प्रेम आहे?की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि करोना चा वापर होतोय?”

केंद्रीय पथकानं दिल्यात सुचना

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्रिय पथकांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. प्रशासकिय अधिकाऱ्यांपासून ते वैद्यकिय कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी त्यांनी मार्गदर्शक सुचना दिल्यात.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 20 ते 30 व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. यामध्ये कुटुंब, परिसरातील लोक, कामाची जागा आणि इतर कारणांनी संपर्कात येणाऱ्यांचा समावेश असावा. हे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग महत्त्वाचं असून तातडीने करण्यात यावं. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची ICMR च्या सूचनांनुसार चाचणी करण्यात यावी.

कंटेन्मेंटसाठीच्या धोरणांचा पुनर्विचार करावा. रुग्णसंख्या, त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, डिजीटल मॅपिंग, याआधारे कंटेन्मेंट झोन्स तयार करण्यात यावेत. प्रत्येक कंटेन्मेंट झोनसाठी रॅपिड रिस्पॉन्स टीमने एक योजना आखावी.

कंटेनमेन्ट भागांमध्ये घरोघर जाऊन रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात यावा. सोबतच ILI आणि SARI साठीही आरोग्य यंत्रणा आणि फीव्हर क्लिनिक्सद्वारे लक्ष ठेवण्यात यावं.

नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन यासारख्या उपायांचा संसर्ग रोखण्यासाठी वा नियंत्रित करण्यासाठी फारसा परिणाम होत नाही. म्हणूनच जिल्हा प्रशासनाने केंद्रीय आरोग्य खात्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे कठोर आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्यावर लक्ष केंद्रित करावं.

राज्यात कोरोनाचा झपाट्यानं होणारा विस्तार हा चिंतेचा विषय असला तरी ९० टक्कांचा रिक्वव्हरी रेट समाधानाची बाब आहे. राज्य सरकार आणि प्रशासानानं तात्काळ उपाययोजना आखून साथ नियंत्रणात आणावी,असं नागरिकांचं म्हणनं आहे. परंतु पुन्हा लॉकडाऊन करु नये असाही सुर जनमाणसांतून उमटतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER