राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देणार, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी लवकरच राष्ट्रवादीत?

Maharashtra Today

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्ष सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस(Congress) पक्षाला धक्क्यावर धक्के देताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरी, स्थानिक स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केले आहे. आता काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील(Jayshree Patil) राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा सुरु होती. आणि अशातच त्यांची कन्या सोनिया होळकर (Sonia Hodkar)यांची नाशिक राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महानगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यंतरी जयश्री पाटील या लवकरच राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र राज्यमंत्री विश्वजीत कदम, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीतनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आता जयश्री पाटील यांच्या कन्येला अर्थात वसंतदादा पाटील यांच्या पणतीला राष्ट्रवादीने मोठे पद देऊन जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला बळ दिले आहे. जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील एक मोठा गट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यांच्या पक्षप्रवेशाने सांगली महापालिका, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेमध्येही राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला, तर सांगलीत विश्वजीत कदम यांच्या गटाला मोठा धक्का बसू शकतो.

दुसरीकडे, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. पृथ्वीराज पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं पाठबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ झाल्याचे बोलले जात आहे. भाजपसारख्या अन्य पक्षांकडे हे कार्यकर्ते जाण्याअगोदर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादी करत असल्याचंही सांगितलं जातं आहे.
काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सर्वात पुढे राहत असत. गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी पुढाकार घेतला होता. परंतु, त्या तुलनेत काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button