शेतकरी आंदोलन चिघळणार? दिल्लीत पुन्हा 40 लाख ट्रॅक्टर आणण्याचा टिकैत यांचा इशारा

Rakesh Tikait

चंदीगढ : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) काही दिवसातच तीन महिने पूर्ण होणार असून, आंदोलनाचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर आगामी काळात आणखी 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत दाखल होतील, असा निर्वाणीचा इशारा दिला. ते हरियाणातील हिसारमधील खरक पुनिया येथे आयोजित महापंचायतीत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.

मागीलदोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत. किमान आधारभूत किमतीसंबंधी कायदा करावा, अशा मागण्या या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सरकारसोबत बैठका होऊनही शेतकऱ्यांच्या या मागण्यांसंबंधी अद्याप सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अजूनही दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. याविषयी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, “या लढ्यात शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागेल. शेतकरी उभ्या पिकाला आग लावतील. शेतकऱ्यांच्या पिकासंबंधीचा निर्णय हे शेतकरीच घेतील. यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. आगामी काळात दिल्लीमध्ये 40 लाख ट्रॅक्टर पोहोचतील. शेतकरी शेतात पीक घेतील तसेच ते आंदोलनही करतील.

गुरूवारी देशभरात करण्यात आले रेल्वे रोको…

दरम्यान, किसान संयुक्त मोर्चाने आज देशभरात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे रोको करण्याचे आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. 26 जानेवारीनंतर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. नांदेड जिल्ह्यातील किनवट रेल्वेस्थानकावर माकपाच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER