नव्या वर्षात काँग्रेसला मिळेल पटेल, व्होरा यांची जागा भरून काढणारा नेता?

Will The Congress Leadership Conundrum Be Untangled This Makar Sankranti

२०२० हे वर्ष संपताना अहमद पटेल (Ahmed Patel) आणि मोतीलाल व्होरा (Motilal Vora) यांच्या निधनाने काँग्रेसच्या नेतृत्वापुढे पक्षांतर्गत प्रश्न हाताळणे आणि आर्थिक गाडा सुरळीत ठेवणे याबाबत अडचण निर्माण झाली आहे. १४ जानेवारी २०२१ च्या मकरसंक्रांतीच्या पर्वात पक्ष या अडचणीतून बाहेर पडेल अशी आशा आहे. काँग्रेसमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनंतर अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा यांचेच महत्त्व होते. व्होरा अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रशासन पाहात होते तर अहमद पटेल यांच्यावर पक्षासाठी निधी उभारण्याची जबाबदारी होती. याशिवाय ते दोघे मिळून गेल्या २० वर्षांपासून पक्षाची आर्थिक बाजूही सांभाळत होते. सध्या पक्षात राहुल गांधींचे नेतृत्व, सोनिया गांधी यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत पक्षाध्यक्ष राहणे आणि अहमद पटेल व व्होरा यांच्या जागी कोण? हे मुद्दे महत्त्वाचे
आहेत.

राहुल गांधी
राहुल गांधी यांना राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस २००४ पासून प्रयत्न करते आहे. २००६ ला त्यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले. २०१३ ला पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आले आणि नंतर पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले. पण, फारसे सकारात्मक परिणाम दिसले नाहीत.काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटते की, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची मुदत संपेपर्यंत, म्हणजे २०२२ पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी. त्यांनी सर्व राज्यांचा दौरा करून देशातील पक्षाच्या नेत्यांशी – कार्यकर्त्यांशी संपर्क करावा. सोनिया गांधी यांनी हे मान्य केले तर गांधी घराण्याशी अतिशय जवळचे असलेले कमलनाथ हे सोनिया गांधी यांना पक्ष चालवण्यासाठी मदत करण्यास (अहमद पटेल यांच्याप्रमाणे) तयार आहेत. तसे त्यांनी कळवले आहे. पक्षाचे नेतृत्व  गांधी घराण्याच्या बाहेरच्या व्यक्तीकडे असावे, असे मानणाराही एक गट पक्षात आहे. या संदर्भात मुकुल वासनिक, अशोक गहलोत, के. सी. वेणुगोपाल यांची नावे चर्चेत आली; पण यांना  राहुल गांधी यांचा आशीर्वाद मिळेल का, यावर हे सर्व अवलंबून आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी २०१९ ला पक्षाचे अध्यक्षपद सोडताना पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते की, मला किंवा प्रियंकाला निवड प्रक्रियेत न गुंतवता पक्षाचा नवा अध्यक्ष निवडा. पण, पक्षावर गांधी घराण्याची पकड पाहता हे होणे दिसत नाही. सध्या पक्षाचे लक्ष, सोनिया गांधी व्होरा-पटेल यांच्या जागी कोणाला निवडतात यावर लागले आहे. यासाठी कनिष्क सिंह, सचिन पायलट, मिलिंद देवरा , राजीव शुक्ला, कमलनाथ, अशोक गहलोत किंवा डी. के. शिवकुमार यांची नावे दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER