चंद्रपुरात बाटली उभी होणार?

badgeयवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीने उचल खाल्ली असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र वेगळेच वारे वाहते आहे. पाच वर्षांपूर्वी युती सरकारच्या राजवटीत चंद्रपूरमध्ये लागू झालेली दारूबंदी उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या कामात जिल्ह्यातले आजचे सत्ताधारी नेतेच आघाडीवर दिसत आहेत.

महाराष्ट्रात केवळ वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या तीन जिल्ह्यात दारूबंदी आहे. चंद्रपूरच्या दारूबंदीसाठी महिलांनी मोठे आंदोलन छेडले होते. ग्रामसभा आणि जिल्हा परिषदेने ठराव केले होते. दारूबंदी तर झाली. पण दारू बंद झाली नाही. शेजारच्या जिल्ह्यातून चोरटी दारू येऊ लागली. ताडोबा अभयारण्य याचा भागात असल्याने इकडे पर्यटकांची मोठी संख्या आहे. पण दारूच नसल्याने हॉटेल्स तोट्यात गेली.

शौकिनांना जास्त पैसे मोजून घेतलेली चोरटी दारू चोरून प्यावी लागते. यात सरकारचा महसूल तर बुडतच आहे. पण दारूबंदीचा हेतूही पराभूत झाला. भाजपची सत्ता जाताच समीकरण बदलले. दारूबंदी फसल्याची ओरड दारूमाफियांनी सुरू केली. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समीक्षा समिती नेमली. ह्या समितीने लोकांकडून निवेदने मागवली. चंद्रपूरची लोकसंख्या २४ लाख आहे. यातल्या ११ टक्के म्हणजे दोन लाख ६२ हजार लोकांनी दारूबंदी नको असल्याचे मत नोंदवले आहे. महिनाभरातल्या ह्या वेगवान हालचाली पाहिल्या तर सरकारच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न निर्माण होतो.

‘महाराष्ट्रभूषण’ डॉ. अभय बंग यांनी ‘समीक्षा की दारूचे मार्केटिंग?’ अशा शब्दात अशा प्रकारच्या समीक्षेला हरकत घेतली आहे. गावातले दारू दुकान बंद करायला ५० टक्के लोक लागतात. मग इथे ११ टक्क्यात कसा हिशोब होतोय? असा सवाल त्यांनी केला आहे. बंग यांच्या युक्तिवादात दम आहे. हाच न्याय लावला तर उद्या गुटखाबंदीही उठवावी लागेल. दारूबंदी फसत नाही. तिची अंमलबजावणी फसते. शेजारच्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातही हाच अनुभव आहे. फरक एवढाच की तिकडे आरडाओरडा होत नाही, इकडे तो सुरू आहे. पण घड्याळाचे काटे उलटे फिरवणे आता कुठल्याही सरकारला अवघड आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवली तर त्यातून समाजात जाणारा संदेश सरकारच्या अंगावर येणार आहे. उद्धव ठाकरे एवढा पंगा घेतील?


Web Title : Bottle will be stand in Chandrapur

(Maharashtra Today : Online Marathi News Portal, Latest and breaking maharashtra News Headlines in marathi on Maharashtra Today)