पुणे भाजपच्या प्रतिष्ठेवर पाणी ओतणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

BJP

पुणे  : पुण्यातल्या तलावांमध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी तब्बल 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्याचा पराक्रमा गाजवणारे पुणे महापालिकेतील पदाधिकारी कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार, हा एकच प्रश्न सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘निंबाळकर मारहाण’ प्रकरण पालकमंत्री बापटांच्या माथी मारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

पुण्यातल्या पाषाण तलावासह तीन तलावांमधली जलपर्णी काढण्यासाठी 23 कोटी रुपयांची निविदा नुकतीच महापालिकेतर्फे काढण्यात आली. मात्र यातल्या एकाही तलावामध्ये जलपर्णी मुळातच अस्तित्त्वात नसल्याचे आढळून आल्यानंतर महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपची नाचक्की झाली. जलपर्णीचा आभास निर्माण करुन महापालिकेची तिजोरी लुटण्याचा हा प्रयत्न महापालिकेतील भाजपचे गटनेते श्रीनाथ भिमाले आणि ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांनी केल्याची चर्चा भाजपच्याच गोटात सुरु आहे. खोट्या कामांसाठीची निविदा मागे घेण्याची नामुष्की महापालिकेवर आणणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर पक्ष काय कारवाई करणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे याच बिडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यापुर्वी अडचणीत आणले आहे. नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकासोबत पुण्यातला एक नामचिन गुंड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन पोचला होता. या गुंडाचा प्रवेश बिडकर यांच्या बेफिकीरीमुळे सुकर झाला असल्याची चर्चा तेव्हा पुण्यात रंगली होती. भिमाले हे देखील महापालिका सभागृहात वादग्रस्त विधाने करुन सातत्याने भाजपला अडचणीत आणत असतात.

ही बातमी पण वाचा : वीज दरवाढीचा विरोध; देयकें जाळून औद्योगिक संघटनांनी केला निषेध

तलावात अस्तित्वात नसलेली जलपर्णी काढण्यासाठी तेवीस कोटींची निविदा काढण्याच्या प्रकाराने सोमवारी (ता. 11) गंभीर वळण घेतले. या संदर्भात जाब मागण्यासाठी महापालिकेत आलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनातच अतिरीक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या श्रीमुखात लगावली. महापालिकेतील अधिकारी चोऱ्या करतात, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकरांनी “तुमची लायकी काय,” असा प्रश्न केला होता. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकरांनी मारहाण केली.

महापौर मुक्ता टिळक यांच्या देखत मारहाणीचा हा प्रकार घडला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक चेतन तुपे, कॉंग्रेस नगरसेवक रविंद्र धंगेकर आदी यावेळी उपस्थित होते. अतिरीक्त आयुक्त निंबाळकर यांच्या विधानावर महापौर टिळक यांनीही नाराजी व्यक्त केली. वादग्रस्त ठरलेल्या निविदा काढण्याच्या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे आश्वासनही महापौरांनी दिले आहे.

दरम्यान, तेवीस कोटी रुपयांच्या बोगस निविदेचे प्रकरण गरम असतानाच पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा या नद्यांमधील जलपर्णी काढण्याकरता गेल्या पाच वर्षात महापालिकेने खर्च केलेल्या रकमेचाही मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. सुमारे पाच कोटींचा हा खर्च महापालिकेच्या कोणत्या विभागाने केला, हे देखील महापालिका प्रशासनाला अद्याप स्पष्ट करता आलेले नाही. जलपर्णी प्रकरणातून भाजपची प्रतिष्ठा पाण्यात मिळवणाऱ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर पक्ष कारवाई करणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.