समता प्रतिष्ठान घोटाळ्याप्रकरणी अधिकारी निलंबित करणार; धनंजय मुंडेंची घोषणा

Dhananjay Munde

मुंबई : नागपुरात समता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये बरेच गैरव्यवहार झाले. याचे लेखा परीक्षण अहवालात उघडकीस आले. यासंदर्भातील माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी कॅगकडे लपवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार समता प्रतिष्ठानच्या आर्थिक अडचणींची चौकशी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना आमदार सुनील प्रभू, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रसे आमदार नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी समता प्रतिष्ठानच्या घोटाळ्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना उत्तर देताना मुंडे यांनी ही घोषणा केली.

परवानगीशिवाय निधी खर्च
मागील सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या अनुषंगाने सामाजिक न्याय विभाग व बार्टीतर्फे नागपुरात समता प्रतिष्ठान या संस्थेची नेमणूक केली. या संस्थेस १६ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला होता. या निधीचा अपव्यय करत आर्थिक गैरव्यवहार झाले. याविषयी तक्रारदेखील करण्यात आले. सदर उपक्रमाचा आर्थिक लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातून पावत्याशिवाय व संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय निधी खर्च केल्याच्या गैर बाबी उघड झाल्या, असे मुंडे यांनी सांगितले.

अधिकारी आणि राजकीय हितसंबंधातून गैरवर्तन
“याबाबत डिसेंबर २०२० मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे सचिव, बार्टीचे महासंचालक व समाज कल्याण आयुक्त अशी त्रिसदस्यीय समिती होती. ही समिती गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आली होती. या समितीने नागपुरात जाऊन चौकशी केली. यात काही तत्कालीन अधिकारी व त्यांचे राजकीय हितसंबंधांनी मिळून आर्थिक गैरव्यवहार केले, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

या आर्थिक लेखा परीक्षणामध्ये अनेक गैरव्यवहार सुस्पष्ट दिसत आहेत, असे असतानादेखील संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती ‘कॅग’पासून लपवली. याबाबत प्रश्न उपस्थित होताच मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नावे सभागृहाच्या पटलावर ठेवली. त्यांच्याविरोधात निलंबन कारवाईची घोषणा केली. तसेच संबंधित अधिकारी यांचे राजकीय हितसंबंध शोधावेत व त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा टोलाही मुंडेंनी विरोधकांना लगावला. आर्थिक लेखा परिक्षणामधील गंभीर बाबी ‘कॅग’पासून लपवल्याचे अहवालात नमूद केले आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठांचीही चौकशी होणार
या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केले, त्या वरिष्ठांचा या गैरव्यवहारात काय सहभाग आहे? याची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असेही मुंडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER