दिल्लीवरून रेमडेसिवीर आणणे सुजय विखेंना भोवणार? हायकोर्ट संतप्त

Bombay High Court - Sujay Vikhe Patil - Maharastra Today
Bombay High Court - Sujay Vikhe Patil - Maharastra Today

मुंबई :- आपल्या मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष विमानाने थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजक्शन आणल्याचे उघड झाले होते. मात्र आता सुजय विखे यांनी केलेली कृती त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत. कारण दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केले होते. हे वाटप कायद्याला धरून नाही. वाटण्यात आलेली इंजेक्शन्स खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे ही औषधे तत्काळ ताब्यात घ्यावीत आणि त्याचं योग्य प्रकारे कायदेशीर गरजूंना वाटप करण्यात यावं अशीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने या याचिकेची दखल घेतली आहे. इतकंच नाही तर राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी दिली.

आजच्या सुनावणीवेळी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा का दाखल केला जाऊ नये, असा सवाल न्यायालयाने केला आहे. २९ तारखेपर्यंत समर्पक उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रेमडेसिवीर काळाबाजाराची न्यायालयाला शंका आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आता २९ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करून रेमडेसिवीर इंजेक्शन अहमदनगरला आणली. ३०० इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली, अशी माहिती खुद्द सुजय विखे पाटील यांनी दिली होती. ही इंजेक्शन्स सर्वांची आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाही तर माझ्यावर कारवाई झाली असती, असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : रुग्णांच्या नातेवाईकांना ‘रेमडेसिवीर’ आणण्याची सक्ती करू नका : राजेश टोपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button