स्टिव्ह स्मिथ स्वतःला संघाबाहेर बसवणार का?

Steve Smith

स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) हा जगातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. मात्र आयपीएलमधील (IPL) त्याची कामगिरी या लौकिकावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे कर्णधार असलेल्या या खेळाडूने स्वतःहूनच विश्रांती घ्यायला हवी का, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. सीएसके (CSK) व केकेआरविरुद्ध (KKR) अर्धशतक करून त्याने सुरुवात तर चांगली केली होती; पण त्यानंतर त्याचा फॉर्म हरवला आहे. पुढच्या सहापैकी पाच डावांत तो एकेरी धावातच बाद झाला आहे. योगायोगाने स्मिथचा फॉर्म गेला तसा राजस्थानचा (Rajsthan Royals) संघसुद्धा अपयशी ठरू लागला. त्यांनी शेवटच्या सहापैकी पाच सामने गमावले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार फलंदाजीतही त्याची लया घालवून बसलेला दिसतोय. त्याचे फटके व्यवस्थित लागून नाही राहिले आणि त्याच्याकडून अपेक्षित नसलेल्या ढंगाने तो खेळताना दिसतोय. दिल्लीविरुद्ध रविचंद्रन आश्विनला त्याने जो सहज झेल दिला तो पाहता स्मिथच्या फार्मबद्दल चिंतेची स्थिती आहे. दुसरीकडे राजस्थानचा संघही शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. त्यांना परिस्थिती बदलायची असेल तर संघात बदल करायचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नशिबाने बेन स्टोक्स आता उपलब्ध आहे. याशिवाय पहिल्या तीन स्थानी फलंदाजीसाठी रॉयल्सकडे जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॕमसन, स्टिव्ह स्मिथ व रॉबिन उथप्पा आहे.

यापैकी बटलर व स्टोक्स ही सलामी जोडी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे स्मिथ खेळला तर त्याला तिसऱ्या स्थानी यावे लागेल मग संजू सॕमसनचे काय? सॕमसनही स्मिथप्रमाणेच चांगल्या सुरुवातीनंतर ढेपाळला आहे. मात्र तरीही त्याची सरासरी व स्ट्राईक रेट स्मिथपेक्षा चांगला आहे. यामुळे स्मिथ खेळेल की सॕमसन हा मोठा प्रश्न आहे. आणि डेव्हिड मिलरचा विचार केला तर गुंता अधिकच वाढतो. मिलरला यंदा एकच सामना खेळायला मिळाला आहे आणि त्यातही तो एकही चेंडू न खेळता धावबाद झाला आहे.

पण आताच्या परिस्थितीत त्याला खेळवायचा राजस्थानला विचार करावा लागणार आहे. जोफ्रा आर्चर, जोस बटलर व बेन स्टोक्स यांचे स्थान पक्के असल्याने चार आंतरराष्ट्रीय खेळाडूंची एकच जागा शिल्लक राहते. त्यामुळे राजस्थानसमोरचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. म्हणून आता स्मिथ स्वतःच स्वतःला संघाबाहेर ठेवतो का? असा निर्णय घेतो का? हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER