नाणार येणार, मुख्यमंत्री चमत्कार करणार…सेना यू- टर्न घेणार ?

कशासाठी केला होता एवढा अट्टाहास? असा प्रश्न कोकणातील नाणारमध्ये प्रस्तावित तेलशुद्धिकरण प्रकल्पाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेनेला करण्याची वेळ आता आली आहे. “लोकांचा विरोध आहे म्हणून आमचा विरोध आहे” अशी एकच धून लावून शिवसेनेने प्राण गेले तरी बेहत्तर पण नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे सांगत विरोधाची तलवार उपसली होती पण आता ती तलवार म्यान करण्याची पाळी शिवसेनेवर येणार आणि प्रकल्प नाणारमध्येच होणार अशी परिस्थिती निर्माण होत आहे. नाणार प्रकरणी शिवसेना यू-टर्न घेणार असल्याचे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : भाजपा प्रवेशानंतर ‘नाणार’बाबत भूमिका स्पष्ट करणार: नारायण राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने काल राजापूर कणकवलीत जाऊन नाणार प्रकल्प उभारण्यासंदर्भात सकारात्मक संकेत दिले. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलेले मुख्यमंत्री नाणारसारखा तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प आणून कोकणचे कायमस्वरूपी भले करू पाहताहेत आणि विकासाची हीच त्यांची भूमिका सर्वमान्य झालेली येत्या काही दिवसात दिसेल. या प्रकल्पाच्या निमित्ताने कोकणच्या विकासाचे महाद्वार उघडण्याचे मोठे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे.  हे श्रेय घेण्याची मोठी संधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गमवली.
मुळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मागासलेल्या जिल्ह्यांचे संपूर्ण अर्थकारण बदलण्याची अपार क्षमता असलेला हा ३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा सरकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासालाच विरोध होता पण शिवसेना काही स्थानिक लोकांच्या नादी लागली आणि तिने विरोधात भूमिका घेतली.  शिवसेनेने प्रकल्पाबद्दलचे गैरसमज दूर करून तो खेचून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावयास हवी होती.मात्र विकासाऐवजी भावनांवरच सदैव राजकारण करीत आलेल्या शिवसेनेला विकासाशी काही घेणेदेणे नव्हते.

आतातरी शिवसेनेला उपरती होईल अशी अपेक्षा आहे. “लोकांचा विरोध होता म्हणून आम्ही विरोध केला आता लोकांचा प्रकल्पाला पाठिंबा असेल तर आमचा विरोध नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लगेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. याचा अर्थ या प्रकल्पाला मिळत असलेल्या मोठ्या समर्थनाची कल्पना आता शिवसेनेलादेखील आलेली आहे, असा काढता येईल.

ही बातमी पण वाचा : रिफायनरी नाणारला करण्याबाबत पुन्हा चर्चा करू – देवेंद्र फडणवीस

मुळात काही पर्यावरणवाद्यांच्या मदतीने  तथाकथित पुढाऱ्यांनी ग्रामदेवतेसमोर शपथा घ्यायला लावून प्रकल्पविरोधाची भूमिका लोकांना घ्यायला लावली हा इतिहास अगदी अलिकडचा आहे. मात्र, आज लोकांना प्रकल्प हवा आहे.  प्रकल्पाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे शिवसेनेने आता खूपच ताणून धरले तर ते लोकभावनेच्या विरोधात जाणारे असेल. आधी विरोध करून बसलो आणि आता समर्थनाशिवाय पर्याय नाही अशा कचाट्यात शिवसेना सापडत चालली आहे.

या प्रकल्पासाठी १५ हजार एकर जमीन लागणार आहे. त्यातील ७ हजार ५०० एकर जमीन अधिग्रहित करण्यासंबंधी जमीन मालकांनी संमती दर्शविली आहे. प्रकल्पासाठी एवढी मोठी जमीन का असा सवाल करणाऱ्यांना हा प्रकल्प १० ते ११ हजार एकरात बसविण्याचीही तयारी असल्याचे केंद्र सरकारने आधीच बोलून दाखविले आहे. तसा विचार केला तर प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या ७० टक्के जमिनीबाबत प्रकल्पग्रस्तांची संमती आधीच मिळालेली आहे. प्रकल्पाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहत जनजागृती करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानला शाबासकीच दिली पाहिजे.
आता भूसंपादन कोणत्या दराने करणार हे एकदाचे जाहीर झाले तर उरलासुरला विरोधदेखील संपणार आहे. कारण, नाणारसह १४ गावांमधील लोकांना मोबदल्यापोटी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील तीन गावे अशी आहेत की ज्यांना जवळपास ४ हजार कोटी रुपयांचा मोबदला मिळेल.

अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेने मुद्दा उगाच भावनिक न करता कोकणच्या पुढच्या दोनचार पिढ्यांच्या विकासाचा विचार करून नाणार प्रकल्पाला भक्कम पाठिंबा जाहीर करावा. आधी घेतलेली एक भूमिका विकासाच्या उद्देशाने बदलली तर त्यात गैर काय? टीका करणारे करतीलच, शिवसेनेने कोलांटउडी घेतली असा गदारोळ ही करतील, पण कोकणच्या भल्याला महत्त्व द्यायचे की टीकाकारांना घाबरायचे याचा निर्णय मातोश्रीने घ्यायचा आहे.  प्रकल्पाला विरोधासाठी विरोध करीत राहिलात तर विकासविरोधी ठराल.विरोधाची भूमिका शिवसेनेने कायम ठेवली तर कोकणी माणसाशी असलेली इतक्या वर्षांची नाळ तुटण्याची ती सुरुवात असेल….