पवारांशी भिडणार उद्धव?

Uddhav Thackeray & Sharad Pawar

badgeमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काही खरे दिसत नाही. त्यांची ताजी वक्तव्ये पाहिली तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांशी पंगा घेण्याची तयारी तर चालवली नाही ना? असा संशय येतो. लोकहिताच्या मुद्यांवर शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी बनवून सत्तेत आले; पण राष्ट्रीय प्रश्नांवर तिघांमध्ये मतभेद उफाळून येत आहेत. सरकारला धोका नाही; पण वाढते मतभेद चिंता वाढवणारे आहेत.

सीएए म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि एनपीआर म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर… मोदी सरकार आणू पाहात असलेल्या ह्या तिन्ही मुद्यांवरून वादळाने सारा देश ढवळून निघत आहे. महाराष्ट्रातही महाआघाडीच्या सरकारमध्ये ठिणग्या उडू लागल्या आहेत. नागरिकत्व कायदा राज्यात अमलात आणायचा की नाही? हा वादाचा सर्वांत मोठा मुद्दा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा नागरिकत्व कायद्याला कडाडून विरोध आहे. लोकसभेत हा कायदा मंजुरीला आला तेव्हा शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळ वाद झाला होता. पुढे राज्यसभेत हा विषय आला तेव्हा शिवसेनेने पलटी मारली. आता मात्र ‘नागरिकत्व कायद्याची काळजी नको’ असे उद्धव सांगत असल्याने दोन्ही काँग्रेसच्या भुवया उंचावल्या आहेत.

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासावरूनही महाआघाडीत वेगवेगळी मतं उघड होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ह्या सरकारचे ‘रिमोटधारक’ शरद पवार यांना अजिबात आवडलेली नाही. पवारांनी तसे बोलूनही दाखवले. सरकारला तीन महिने होत आले आहेत. तीन महिन्यांत प्रथमच पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

आज तर पवार आक्रमक बोलले. एल्गार प्रकरणात पोलिसांच्या वर्तनावर आपल्याला तपास पाहिजे, असे पवार म्हणत आहेत. ‘राष्ट्रवादी एसआयटी मागत आहे ही माहिती अवघ्या दोन तासांत दिल्लीत कशी पोचली?’ असा त्यांचा सवाल आहे. संभाजी भिडे गुरुजी की देवेंद्र फडणवीस? पवारांचा निशाणा कुणावर आहे? मतभेद असले तरी सरकार पडणार नाही. तसे वातावरणही नाही. पण उद्धव पवारांशी का पंगा घेत आहेत हे अनेकांना पडलेले कोडे आहे. उद्धव पुन्हा भाजपच्या तंबूत जाण्याचा तर विचार करीत नाही ना? राजकारणात काहीही होऊ शकते. एक सांगू का? हे तर ट्रेलर आहे. ‘पिक्चर तो अभी बाकी है.’