शरद पवार बाजी पलटवतील?

Sharad Pawar

Badgeशरद पवार यांना ‘तेल लावलेला पहिलवान’ म्हटले जाते. हातातून चाललेली कुस्ती कशी जिंकायची ते शरद पवारांना छान कळते. हातून निसटलेली विधानसभा निवडणूक परत खेचून आणून त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षीही आपण प्रतिस्पर्ध्याचा गेम करू शकतो हे दाखवून दिले.  पवारांनी भाजपला १०५ जागांवर रोखल्याने आज राज्यात त्रिशंकू स्थिती आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पवारांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा शिवसेनेला मुंबईचे तख्त हाताशी आले असे वाटू लागले होते. पण पवारांनी आज ‘आम्ही विरोधात बसणार’ असे सांगून उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा आणला आहे. पण पवारांचा गेम अजून संपला नाही असे त्यांना जवळून ओळखणाऱ्यांना वाटते. काय जादू करतील पवार?

मनातले आणले तर पवार काहीही करू शकतात. त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे. २० वर्षांपूर्वी त्याची प्रचिती महाराष्ट्राने पाहिली. १९९९ च्या निवडणुकीत थोडीफार आजच्यासारखीच परिस्थिती होती. कुण्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. भाजप आणि शिवसेनेत सत्तेचे समीकरण जुळत नव्हते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. भाजपने टाईमपास करणे चालवले होते. पवारांनी सोनिया गांधी यांना गाठून सत्तेचा गेम पालटवला. विलासराव देशमुख तेव्हा आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले होते. २० वर्षानंतर पवार तोच चमत्कार करणार काय? याची अजूनही उत्सुकता आहे.

यावेळी महायुतीकडे बळ आहे. पण मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना अडून बसल्याने सत्तापेच उद्भवला आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले तर सरकार बसू शकते. त्यामुळेच पवारांनी सोनिया गांधींची चार दिवसांपूर्वी भेट घेतली तेव्हा सेनेच्या आशा वाढल्या. आज ‘आम्ही विरोधात बसणार’ असे पवारांनी जाहीर करूनही पवार काही जादू करतील अशी शिवसेनेला आशा आहे. कारण पवार जे बोलतात त्यापेक्षा त्यांच्या मनात काही वेगळे असते याचा अनुभव राज्याला बरेचदा आला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसवाले आणि खास करून उद्धव ठाकरे अजूनही पाण्यात देव बुडवून आहेत. दोन दिवसात पुन्हा सोनियांशी बोलतो असे पवार म्हणाले आहेत. त्यामुळे पवार ही कुस्ती मारतात का? ह्याची उत्सुकता ताणली गेली आहे.