गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ब्रिटिश कौन्सिलची मदत घेणार – प्रा.वर्षा गायकवाड

ब्रिटीश कौन्सिलचे शिष्टमंडळ -शिक्षणमंत्री भेट

मुंबई  : मागील अनेक वर्षांपासून ब्रिटीश कौन्सिल राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाबरोबर काम करीत आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी सुद्धा शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ब्रिटीश कौन्सिल इंडियाच्या संचालक बार्बरा विकहॅम, पश्चिम भारताचे सहायक संचालक वेनॉर्न डिसूझा आणि पश्चिम भारतासाठी शाळांचे संपूर्ण काम पाहणाऱ्या उर्वी शहा यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली.

शिक्षणात मागील अनेक वर्षांपासून ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ब्रिटिश कौन्सिल राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देत असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांची असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच नवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून या संस्थेची मदत घेण्यात येणार असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, बीड, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर येथेही ब्रिटीश कौन्सिलने राबविलेल्या उपक्रमांना यश आले असून या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असल्याचे दिसून येत असल्याने अधिकाधिक ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी ब्रिटीश कौन्सिलची मदत घेण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने ब्रिटीश कौन्सिलमार्फत राबवण्यिात येणारे उपक्रम याबाबतची माहिती दिली. ब्रिटीश कौन्सिल आणि टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने महाराष्ट्रात इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी तेजस (technology enabled education through joint action and strategic initiatives) आणि चेस (continuous help to the teachers of English from secondary) या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.