धार्मिक स्थळे उघडली नाहीत यासाठी सेक्युलर म्हणून हिणवणार?- शरद पवार

Sharad Pawar-PM Modi

मुंबई : मंदिर उघडण्याच्या संदर्भात राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारल्याबाबत संताप व्यक्त करताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रश्न केला – धार्मिक स्थळे उघडली नाहीत यासाठी सेक्युलर म्हणून हिणवणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून दारूची दुकाने उघडली तर मंदिर बंद का? अशी विचारणी केली आहे. पवार म्हणाले, राज्यपालांचे हे वागणे संविधानाच्या चौकटीबाहेर आहे.

राज्यातली मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाने आज राज्यभर आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली.

त्या पत्रावरून राज्यात वादळ निर्माण झाले आहे. राज्यपालांनी पत्रात वापरलेली भाषा घटनेला आणि त्या पदाला धरून नाही. त्यांचे पत्र वाचून मला धक्का बसला आणि दु:ख झाले, असे शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शरद पवार पत्रात म्हणतात, महाराष्ट्र सध्या कोरोनाविरुद्ध निकराची झुंज देत आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत गर्दीची ठिकाणे लगेच खुली करणं योग्य होणार नाही. राज्यपालांनी ज्या तत्परतेने मत मांडले ते स्वागतार्ह आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये मोकळा संवाद असायलाच पाहिजे. मात्र राज्यपालांनी जी भाषा वापरली ती वाचून मी आश्चर्यचकितही झालो आहे.

सिद्धिविनायक, पंढरपूर, शिर्डीचे साईबाबा मंदिर अशा ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे सध्या मंदिरे खुली करू नयेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, असे पवारांनी पंतप्रधानांना म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER