सलमान खानचा राधे झी स्टुडियोला तारणार?

Salman Khan Radhe save Zee Studios

सुभाषचंद्र गोयल (Subhash Chandra Goyal) यांच्या मालकीचा झी समूह वृत्तवाहिन्या आणि सिनेमाच्या वाहिन्या प्रसारित करून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. मात्र गेल्या काही काळापासून झी स्टुडियो एका मोठ्या हिटची वाट पाहात आहे. झी स्टुडियोने तयार केलेला ‘खाली पीली’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष करामात करू शकले नाहीत. एखादा मोठा सिनेमा मिळावा म्हणून झी स्टुडियो प्रयत्न करीत होता. त्याचाच एक भाग म्हणून सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित ‘राधे- यूअर मोस्ट वांटेड भाई’ सिनेमाचे सर्व अधिकार विकत घेण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. अखेर झी स्टुडियोला या व्यवहारात यश आले असून सलमानचा हा सिनेमा झी स्टुडियोला तारणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सलमान खानने गेल्या वर्षी ‘राधे- यूअर मोस्ट वांटेड भाई सिनेमाला सुरुवात केली होती. सलमानचा हा सिनेमा कोरियन सिनेमा द आउटलॉजची रिमेक असल्याचे सांगितले जाते. प्रभुदेवाकडे सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या अॅक्शनपॅक्ड सिनेमात सलमानसोबत जॅकी श्रॉफ, दिशा पाटणी आणि रणदीप हुड्डा यांच्याही भूमिका आहेत. यावर्षी म्हणजेच 2020 च्या ईदला हा सिनेमा प्रदर्शित करण्याची सलमानची योजना होती. पण कोरोनाने सगळेच मुसळ केरात टाकले. लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग जवळ जवळ सहा ते सात महिने होऊ शकले नाही. गेल्या महिन्यात सरकारने शूटिंगला परवानगी दिल्यानंतर सलमानने ‘राधे’चे शूटिंग सुरु केले. शूटिंग आता पूर्ण झाले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु करण्यात आलेले आहे.

सलमान आपला हा सिनेमा यशराज फिल्म्सला देऊ इच्छित होता. यासाठी यशराजशी बोलणीही सुरु होती. पण यशराज सलमान जी किंमत मागत होता ती देण्यास तयार होत नव्हता. एवढेच नव्हे तर सलमान खान यशराजसाठी करणाऱ्या ‘टायगर 3’ सोबत या सिनेमाचे डीलिंग करण्यासही यशराजने नकार दिला होता. याच दरम्यान झी स्टुडियोही सलमान खानसोबत राधेचे सर्व प्रकारचे अधिकार विकत घेण्यासाठी प्रयत्न करीत होता. कितीही उशिर झाला तरी आपला हा सिनेमा थिएटरमध्येच रिलीज करण्याचा निर्णय सलमान खानने घेतला होता. यशराजसोबतचे डील फिसकटल्यानंतर सलमान खानने झीबरोबरचे डील फायनल केले. या डीलनुसार सलमानच्या ‘राधे; सिनेमाचे भारतासह ओव्हरसीजमध्ये थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करण्याचे अधिकार, म्यूझिक आणि सर्व प्रकारचे डिजिटल राइट्स झी स्टुडियोला मिळाले आहेत. यासाठी झी स्टुडियोने सलमान खानला जवळ जवळ 230 कोटी रुपये मोजलेले आहेत.

सलमान खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर पहिल्या चार पाच दिवसातच 200 ते 300 कोटींचा बिझनेस करतात. त्यामुळे झीने गुंतवलेली रक्कम त्यांना पहिल्या काही दिवसातच मिळेल असे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER