राजू शेट्टींबरोबर खरंच सदाभाऊ जातील का?

Sadabhau Khot - Raju Shetti

माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत भाजपवर (BJP)नाराज असल्याची बातमी आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे नेते आपल्याला किंमत देत नाहीत, अशी त्यांची खंत आहे. सदाभाऊ हे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे कट्टर समर्थक होते पण दोघांमध्ये बेबनाव झाला आणि सदाभाऊ हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये राज्यमंत्री असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:ची संघटना निर्माण केली पण या संघटनेचा फारसा प्रभाव ते निर्माण करू शकले नाहीत. शेट्टी आणि खोत हे दोघेही मूलत: शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या आंदोलनातील लढवय्ये. पुढे शेट्टींनी वेगळी संघटना स्थापन केली.

राजू शेट्टींची साथ सदाभाऊंनी सोडली. तिकडे शेट्टी आधीच एनडीएतून बाहेर पडले होते. त्याचा फटका शेट्टींना बसला. खासदारकीला ते पराभूत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विषयक धोरणांवर शेट्टी यांनी सडकून टीका केली, थेट मोदींचा रोष ओढावून घेतला. असे म्हणतात की आपल्या पराभवाचे विश्लेषण करताना शेट्टी यांनी समर्थकांना सांगितले की आपण मोदींविरोधात निवडणूक लढत असल्यासारखे वागलो, त्यामुळे लोकांनी आपल्याविरोधात ईव्हीएममध्ये राग व्यक्त केला. त्याऐवजी आपण आपलीच रेष मोठी करीत शेतकरी हितासाठी काय आवश्यक आहे हे मतदारांसमोर जोरकसपणे मांडले असते तर आपल्याला सहानुभूती मिळाली असती, असा तर्क त्यांनी दिला होता.

आता प्रश्न असा आहे की राजू शेट्टी व सदाभाऊ एकत्र येतील का? ‘लुटारुंच्या विरोधात आम्ही दोघे लढलो पण जर आज राजू शेट्टींनी लुटारूंची संगत सोडली तर निश्चितपणाने त्यांना परत खांद्यावर घ्यायला सदाभाऊ खोत तयार आहे’, असं मोठं विधान सदाभाऊंनी केलं आहे. राजू शेट्टी हे प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास रस्त्यावर उतरले तर निश्चितपणाने राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन’, असं खोत म्हणाले आहेत. दोघे पुन्हा एकत्र आले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मजबूत होईल ती या अर्थाने की शेट्टी यांना गमावलेला सहकारी मिळेल. या पलिकडे काहीही नाही.  शेट्टींकडे कार्यकर्त्यांचे आजही जे नेटवर्क आहे, खोतांकडे ते फारसे नाही. भाजपने शेट्टींच्या विरोधातील चेहरा म्हणून त्यांना पुढे केले.

रामदास आठवलेंचा रिपाइं, महादेव जानकरांचा रासप आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम या शिवाय चवथा सहकारी म्हणून भाजपने खोत यांना जवळ केले. खोत चांगले वक्ते आहेत, रांगडे बोलतात, शेतकरी चळवळीचा आणि प्रश्नांचा चांगला अभ्यासही आहे पण ते शेट्टी यांच्यासारखे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नाहीत. जानकरांच्या मागे धनगर समाजाची पाटी आहे, मेटे हे मराठा चेहरा म्हणून भाजपला हवे असतात, आठवले हे दलित चेहरा आहेत पण खोत हे स्वत:ची अशी ओळख निर्माण करू शकले नाहीत. शेट्टी यांचे आधी कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर विरोधक एवढ्याभोवतीच त्यांची प्रतिमा फिरत राहिली आहे. साखर कारखानदारांच्या विरोधात उभा राहिलेला ऊस उत्पादक शेतकºयांचा बुलंद आवाज म्हणून शेट्टी यांची ओळख आजही आहे पण त्याचवेळी ते साखर कारखानदारांचा ज्या दोन पक्षांमध्ये बोलबाला आहे त्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने नाराजीची भावनादेखील आहे व त्याचा फटकाही त्यांना बसला आहे. आता तर ते राष्ट्रवादीच्या मार्गाने विधान परिषदेवर जाण्याच्या तयारीत आहेत. सदाभाऊ हे शेट्टींबरोबर गेले तर पुन्हा त्यांना मोठ्या झाडाखालचं छोटं झाड म्हणूनच राहावे लागणार आहे. भाजपसोबत असताना आज त्यांना जे थोडेफार महत्त्व आहे तेवढेही त्यांना शेट्टींबरोबर गेल्याने राहील की नाही या बाबत शंका आहे. विश्वासाला एकदा तडा गेल्यानंतर दोघांचे संबंध चांगले झालेही तरी संबंधांमधील पूर्वीची गोडी कायम राहील की नाही हा प्रश्न आहे. स्वत:ची ओळख निर्माण करायला निघालेल्या सदाभाऊंनी मध्येच ही वाट सोडून पुन्हा एकदा शेट्टींची साथ दिली तर त्यांच्या विश्वासार्हतेलाही तडा जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER