साउथच्या सुपरहिट अन्नियनच्या रिमेकमध्ये रणवीर सिंह दिसणार?

Maharashtra Today

अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) वेगवेगळ्या भूमिका साकारणे आवडते. तो ज्याप्रमाणे फॅशन करून चर्चेत राहाण्याचा प्रयत्न करतो तशाच प्रकारच्या वेगळ्या भूमिका करून चर्चेत राहाण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘सिम्बा’, ‘गली बॉय’ हे त्याचे काही उल्लेखनीय सिनेमे. रणवीर आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या मॅचवर आधारित ‘८३’ नावाच्या सिनेमात त्यावेळचा भारतीय टीमचा कॅप्टन असलेल्या कपिल देवची भूमिका साकारीत आहे. तर त्याची पत्नी दीपिका पदुकोण या सिनेमात कपिल देवची पत्नी रोमाची भूमिका साकारीत आहे. आता तो अशीच एक वेगळी भूमिका करणार असल्याचे बॉलिवूडमध्ये (Bollywood) म्हटले जाऊ लागले आहे. आणि ही भूमिका आहे साऊथमध्ये सुपरहिट झालेल्या ‘अन्नियन’ सिनेमातील. रणवीरने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यातील त्याचा लुक पाहून तो या साऊथच्या रिमेकमध्ये दिसेल असे सांगितले जात आहे.

साऊथमध्ये प्रख्यात दिग्दर्शक शंकरने (S. Shankar) २००५ मध्ये ‘अन्नियन’ नावाचा सिनेमा तयार केला होता. प्रख्यात अभिनेता विक्रमने (Vikram) यात मुख्य भूमिका साकारली होती. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर होता. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. एवढेच नव्हे तर हा सिनेमा हिंदीत डब करून ‘अपरिचित’ नावाने रिलीज करण्यात आला होता. हिंदीतही हा सिनेमा सुपरहिट झाला होता. याच सिनेमाची रिमेक केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सुरु आहे. या रिमेकमध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर त्याच्या नव्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला होता. तेव्हा त्याने तेथे शंकरची भेट घेतली होती. आणि ‘अन्नियन’च्या रिमेकबाबत चर्चा करून शंकरच्या दिग्दर्शनात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच ‘अन्नियन’च्या रिमेकचे काम पुढे सरकले आहे. या सिनेमाची निर्मिती दीपिका पदुकोण करणार असून तिच्यासोबत आणखी काही प्रोड्यूसर कंपन्याही यात सहभागी होत आहेत. सिनेमातील अन्य कलाकारांची निवड चार-पाच महिन्यानंतर केली जाणार असून रिमेक करताना कथानकात आताच्या काळानुसार बदल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही बातमी पण वाचा : अक्षयने अयोध्येत पूजा करून सुरु केले रामसेतूचे शूटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER