राज-उद्धव एकत्र येणार का? मुख्यमंत्री म्हणाले, ‘संकटकाळात एकत्र येणे चांगले’

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वांना सतत पडणारा प्रश्न म्हणजे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) एकत्र येणार का? या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखड उत्तर दिले. लोकसत्ता दैनिकाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावर प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं होतं. तोच प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या गोष्टी परमेश्वराला माहिती असतील, त्या मला माहिती असणे शक्य नाही. मात्र संकटकाळात एकत्र येणे चांगले असते.

आज देशात व्यापक प्रयत्न म्हणून ममता, जगनमोहन रेड्डी यांना हाक देताय. मग संभाव्य खेळाडू मनसे असू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, देशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र येणे योग्य असते. सध्या देशात जे संकट आहे ते साधंसुधं नाही, या परिस्थितीशी योग्य प्रकारे लढलो नाही तर देशात अराजक येईल. लॉकडाऊन किती काळ चालवायचा माहिती नाही. माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्तापुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ? माझं म्हणणं आहे जे जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं, राजकारण थांबवावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

माझी खुर्ची खेचाल, खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं; पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर बसलो आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही. मी पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं होतं. मी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची लालसा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. त्यामुळे माझी खुर्ची खेचाल, तुम्ही बसा. पण खुर्चीचा मुद्दा काय आहे तर काम करा, माझ्यापेक्षा दुसरा काम करत असेल तर बरं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी १९८७ साली झालेल्या पार्ले येथील पोटनिवडणुकीची आठवण करवून दिली. शिवसेना आणि भाजपा यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीची सुरुवात खऱ्या अर्थाने १९८७ सालापासून झाल्याचं ते म्हणाले. “याची सुरुवात १९८७ साली झाली. कदाचित भारतातली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेलेली आणि जिंकलेली पहिली निवडणूक होती पार्ल्याची पोटनिवडणूक. शिवसेनेनं ती लढली आणि जिंकली होती. शिवसेनाप्रमुख हे या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे देशातील पहिले नेते ठरले. त्यानंतर हिंदुत्व या मुद्द्याच्या प्रचाराच्या गुन्ह्याची किंमत त्यांना भोगावी लागली. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता. त्यानंतर ८९ च्या आसपास रथयात्रा वगैरे सुरू झाली. हिंदू नागरिक हिंदू म्हणून मतदान करू शकतात, हे ८७ सालच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिलं. आम्ही दोन्ही पक्ष तोपर्यंत राजकीय अस्पृश्य होतो, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजपासोबत युती तुटल्याचा संदर्भ उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. आमचा युतीचा मोठा कालखंड विरोधी पक्ष म्हणून गेला आहे. आम्ही राजकीय अस्पृश्य होतो. वाईट काळात एकत्र आलो होतो. पण वाईट काळ गेल्यानंतर वेगळे का झालो? हे का घडलं हा प्रश्न जनतेलाही पडला असेल. एका विचाराच्या पायावर झालेली युती तुटली का? हा प्रश्न आधी येतो. पण आमची आज युती नसली तरी हिंदुत्वाचे विचार सगळ्यांना पटले आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही असं म्हटलं होतं. त्यांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाशी संबंधित होतं, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button