जिल्ह्यातील महिलांकरिता बांबूपासून रोजगार उपलब्ध करणार – संजय राठोड

अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन

Sanjay Rathod

यवतमाळ : पूजा करतांना देवासमोर लावण्यात येणारी अगरबत्ती निर्मितीचा हा घरबसल्या व्यवसाय महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सोबतच लाखेपासून बांगड्या निर्मितीच्या व्यवसायाबाबतही विचार सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ५०० महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

विश्रामगृह येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत बांबूपासून रोजगारनिर्मितीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, वनमंत्र्यांचे खाजगी सचिव रवींद्र पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते.

बांबूपासून अनेक वस्तूंची निर्मिती करणे शक्य आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, घरोघरी बचत गटाला बांबूपासून रोजगार निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबत प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन जवळपास ५०० महिलांना यातून रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. लाखेपासून बांगड्या व बांबूपासून अगरबत्ती बनविण्याचा प्रकल्प जिल्ह्यात उभा करण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.

तयार होणारी अगरबत्ती खरेदी करण्यासाठी आयटीसी मंगलदीप यांच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून लाखेच्या बांगड्यांची खरेदी श्री. पारधी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. याबाबत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे डॉ. रंजन वानखेडे यांच्या समन्वयातून प्रस्ताव सादर करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER