प्रदीप कंद पुन्हा राष्ट्रवादीत परतणार?

शिक्रापूर : शिरुर-हवेली मतदार संघात प्रदिप कंद (Pradip Kand) पुन्हा राष्ट्रवादीत (NCP) परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या भाजपमध्ये (BJP) असलेले प्रदीप कंद यांनी याबाबत मौन पाळले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तगड्या माजी आमदाराने कंद यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी थेट पवार साहेबांकडेच शब्द टाकल्याचेही बोलले जात आहे.

प्रदीप कंद २०१४ मध्ये विधानसभेसाठी तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभेसाठी इच्छुक होते. विधानसभा, लोकसभा निवडणुक लढण्यासाठी पूर्ण क्षमता असताना कंदांना मात्र, विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरता आले नाही.

आता पुढच्या निवडणुकीला अजून चार वर्षे आहेत. आपल्याला पुन्हा विधानसभा निवडणूकीला सामोरे जायचे झाल्यास सुरक्षीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याची भावना कंदांची असल्याचे त्यांचे काही समर्थक खाजगीत सांगतात. शिवाय आम्ही मुळचे राष्ट्रवादीचेच असल्याचे कंद समर्थकांमधील काहीजण छातीठोकपणेही सांगतात. याच पार्श्वभूमीवर आता कंद राष्ट्रवादीत येणे त्यांच्या समर्थकांसाठीही गरजेचे आहे.

एवढेच नाही तर, पिंपरी-चिंचवड परिसरातील एक माजी आमदार तर थेट मोठ्या साहेबांकडे कंदांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चाही भाजपा गोटातून होत आहे.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रवक्ते विकास लवांडे यांच्या एका फेसबूक पोस्टसह कंदांच्या राष्ट्रवादी प्रवेशांची चर्चां शिरुर-हवेली मतदार संघात होत आहेत. मात्र, याबाबत कंदांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER