राऊत म्हणतात त्याप्रमाणे पवार मुखवटा काढतील?

Sanjay Raut - Sharad Pawar - Rahul Gandhi

शिवसेनेच्या (Shiv Sena) मुखपत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) हे दर रविवारी ‘रोखठोक’ लिहितात. आजच्या लेखात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे काँग्रेसचेच (Congress) अपत्य आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार (Sharad Pawar), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक, के.चंद्रशेखर राव हे बडे नेते मूळ काँग्रेसचेच आहेत असा शोध लावला आहे. पटनायक हे कधी काँग्रेसमध्ये होते असे स्मरत नाही. त्यांचे वडील बिजू पटनायक यांची राजकीय गादी सांभाळली तेव्हापासून ते एकदाही काँग्रेसमध्ये नव्हते; असो, पण राऊत यांच्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित करणे हा अपराध आहे. कारण आम्हाला काय कळते असे ते लगेच म्हणतील. तर या सगळ्या नेत्यांनी घातलेले वेगवेगळे मुखवटे काढून फेकले तर देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष म्हणून उभारी घेईल असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. याचा अर्थ शरद पवारांपासून जगनमोहनपर्यंत सगळ्यांनी आपापले पक्ष विसर्जित करून काँग्रेस मजबूत करण्यासाठी एकत्र यावे असा धाडसी सल्ला राऊत यांनी दिला आहे.

शरद पवार यांना आपल्या राजकारणाच्या चालीसाठी जे करायचे असते ते राऊत यांच्याकडून ते लिहून घेतात असा आक्षेप राऊत यांचे वैचारिक विरोधक घेत असतात.हा आक्षेप खरा मानला तर आज राऊत यांनी दिलेल्या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. एक पुढारी होते, त्यांची एक सवय होती. सभेला गर्दी झालेली आहे की नाही हे बघण्यासाठी ते आधी चारसहा चेल्यांना सभास्थानी पिटाळायचे आणि गर्दी झाल्याचा निरोप आला की मग पुढारी महाशय स्वत: सभास्थानी पोहचायचे. तसे काँग्रेसमधील नेतृत्व अभावाचा फायदा घेण्याची हीच संधी असल्याचे लक्षात आल्याने पवार यांनाच वेगवेगळ्या चुली मांडलेल्या देशभरातील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र यावे असे वाटते की काय अशी शंका राऊत यांच्या लिखाणाच्या निमित्ताने येत आहे. राऊत यांच्या या आवाहनाला शरद पवार लगेच प्रतिसाद देतील असे नाही; पण या निमित्ताने राऊत यांनी एक विषय नक्कीच छेडला आहे.

काँग्रेसमध्ये आज नेतृत्वाची उणीव आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना तब्येतीच्या मर्यादा आहेत, त्या जाहीरपणे पूर्वीच्या उत्साहाने आज फिरू शकत नाहीत. भाजपसारख्या तगड्या पक्षाला ‘हेडआॅन’ घेण्यात त्यांना तब्येतीच्या मर्यादा आहेत तरीही त्या काँग्रेससाठी जीव ओतत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अध्यक्ष करण्यास पक्षातील काही दिग्गज नेत्यांचा विरोध आहे. त्यांचा राहुल यांच्या नावाला विरोध नाही तर त्यांच्या शैलीला विरोध आहे. राहुल हे काँग्रेसमधील कम्युनिस्ट विचारांच्या चौकडीने घेरले गेले आहेत असे या दिग्गज नेत्यांचे म्हणणे आहे. ‘लीडरशिप क्रायसिस’ अनुभवत असलेल्या या पक्षाला नेतृत्व देण्याची अफाट क्षमता शरद पवार यांच्यात आहे; पण ते तसा निर्णय घेतील का हा जर-तरचा प्रश्न आहे.

राऊत हे आधी फक्त भाजप आणि भाजप नेत्यांच्या विरोधात लिहायचे; पण सध्या त्यांनी भाजपबरोबरच काँग्रेसवरही कडवट भाष्य करणे सुरू केले आहे. रविवारच्या रोखठोकमध्ये त्यांनी, ‘वादळ आले तर पडझड होईल इतकीही काँग्रेस देशात कुठे दिसत नाही’ असे एक वाक्य लिहिले आहे. केवळ महाराष्ट्रापुरते अस्तित्व असलेल्या आणि तेथेही क्रमांक-३ चा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका संपादक नेत्याने काँग्रेसबद्दल असे लिहावे हे आश्चर्यच; पण काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना असल्या कुचक्या टीकेचा रागही येत नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी काँग्रेस पक्ष हा जर्जर झाला असल्याची टीका केली आहे. आज सगळेच तसे म्हणत आहेत; कारण काँग्रेस पक्षाचा नूर आणि सूर हरवला आहे. एकदा वाघ जर चिखलात फसला तर कोणीही प्राणी येऊन त्याला लाथ मारून जातात. काँग्रेसची तीच अवस्था झाली आहे. अशा वेळी राऊत यांनी टीकेची संधी साधली तर त्यात गैर ते काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER