पठाण तरी शाहरुखला यश मिळवून देईल?

Shahrukh Khan

गेल्या काही वर्षांपासून शाहरुख खानचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले आहेत. अगदी फॅन, रईसपासून झीरोपर्यंत त्याला प्रेक्षकांनी नाकारले आहे. त्यामुळे झीरोनंतर त्याने एकही चित्रपट केला नाही. आता त्याने यशराजचा पठाण चित्रपट स्वीकारला असून तो 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तरी त्याला यश मिळवून देऊ शकेल का असा प्रश्न बॉलिवुडमध्ये आत्तापासूनच विचारला जाऊ लागला आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan) म्हणजे बॉक्स ऑफिसचा बादशाह. त्याच्या चित्रपटाची भारतासह परदेशातील त्याचे प्रशंसकही आतुरतेने वाट पाहात असत. त्याची ही लोकप्रयता पाहूनच यशराज, करण जोहर, फरहान अख्तर त्याला घेऊन चित्रपट तयारर करीत असत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शाहरुखची जादू ओसरू लागली आहे. त्यामुळे शाहरुख अत्यंत विश्वासाने चित्रपट करतो परंतु प्रेक्षक त्याच्याकडे सपशेल पाठ फिरवतात. त्यामुळेच त्याचे चित्रपट अयशस्वी होऊ लागले आहेत. जब हॅरी मेट सेजल,  रईस, डियर डिंदगी, दिलवाले, हॅप्पी न्यू ईयर, जब तक हैं जान हे त्याचे उल्लेखनीय अयशस्वी चित्रपट. रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्सप्रेसनंतर त्याने एकही हिट चित्रपट दिलेला नाही.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये झीरो फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खान प्रचंड दुःखी झाला होता. त्यावेळी बोलताना त्याने म्हटले होते, कदाचित मी हा चित्रपट वाईट बनवला असेल. चित्रपटाचे कथानक मी चांगल्या पद्धतीने सांगू शकलो नसेल. मला आता काही काळ आराम करण्याची गरज आहे असे वाटते. यापूर्वी एक चित्रपट पूर्ण झाला की दोन-तीन महिन्यात मी नवा चित्रपट सुरु करीत असे परंतु आता मला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे असे वाटते. यापूर्वीही माझे काह चित्रपट फ्लॉप झाले आहेत. परंतु मी लवकरच नवीन चित्रपट घेऊन माझ्या प्रशंसकांसमोर येईन असेही त्याने म्हटले होते.

त्यानंतर डॉन 3, राजकुमार हिरानी सोबत चित्रपट अशा काही बातम्या आल्या होत्या. परंतु यापैकी एकही चित्रपट सुरु होऊ शकला नाही. खरे तर हिरानीच्या चित्रपटाचे गेल्या वर्षीच शूटिंग सुरु होणार होते. परंतु हिरानी पटकथेवर काम करण्यास वेळ घेत असल्याने ते शक्य झाले नाही. आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीच बंद झाली.

आता शाहरुख पुन्हा एकदा यशराजसोबत काम करणार असून पठाण नावाचा चित्रपट तयार केला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रिकरण सुरु केले जाणार असल्याची माहिती यशराजमधील सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. गेल्या वर्षी प्रचंड यशस्वी झालेल्या ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत वॉर चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून वॉर प्रमाणेच हा चित्रपटही एक अॅक्शनपॅक्ड थ्रिलर असेल असेही सांगितले जात आहे.

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले, सिद्धार्थ आनंदने पठाणची कथा शाहरुखला गेल्या वर्षी ऐकवली होती. कथा ऐकताच आपल्या पुनरागमनासाठी हा चित्रपट अत्यंत योग्य आहे असे शाहरुखला जाणवले आणि त्याने लगेचच चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. पटकथा पूर्ण करून प्री-प्रोडक्शनचे काम सुरु करण्यासही त्याने निर्माता आदित्य चोप्राला सांगितले होते. लॉकडाऊनच्या चार महिन्यात चित्रपटाती पटकथा पूर्ण करण्यात आली असून शाहरुखने ती मंजूरही केली आहे. आता प्री-प्रोडक्शनचे काम सुरु करण्यात आले आहे. अॅक्शन सिक्वेन्सची रचना करण्यात आली असून काही लोकेशन्स निवडण्यात आले आहेत. तसेच रोज विविध कलाकारांशी त्यांच्या भूमिकेबाबत व्हीडियो कॉल करून चर्चाही करण्यात येत आहे. शाहरुखने नोव्हेंबरमधील डेट्स दिल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये शूटिंग करण्याची योजना आखली जात आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली.

पठाणचे शूटिंग संपल्यानंतर शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार असून 2022 च्या मध्यावर हिरानीचा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे  अशीही चर्चा आहे. शाहरुखच्या पुनरागमनाला पठाण किती साद देतो ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. त्यानंतरच त्याच्या पुढील चित्रपटांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER