आमचा मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार का? अनिल परबांचा सवाल

Anil Parab & Ashish Shelar

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड केल्याची सल भाजप नेत्यांच्या मनातून अद्याप गेलेली नाही. वारंवार उठणा-या मुख्यमंत्रिपदाच्या विधानांवरून वा अन्य अनेक विधानांतून ते वेळोवेळी लक्षात येते. भाजप नेते, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा छेडला होता. महाराष्ट्राला मराठा महिला मुख्यमंत्री पाहिजे असे ते बोलून गेले. त्यांच्या याच विधानाचा शिवसेनेचे नेते, परिवहनमंत्री अनिल परब यांनी समाचार घेतला आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार का? असा थेट सवाल परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी उपस्थित केला.

ते भाजपची मराठा महिला मुख्यमंत्री म्हणत आहेत का? भाजपचा मुख्यमंत्री की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार का? आम्ही आमचा मुख्यमंत्री केला आहे, असा टोला अनिल परबांनी आशिष शेलारांना लगावला. आशिष शेलार यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यांना जी स्वप्ने पडली आहेत, त्यांनी तो करावा. शेलार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले हे म्हणणं चुकीचं आहे. जो दगड त्यांनी भिरकावला त्याच्या अनेक ठिकऱ्या उडाल्या आहेत, अशी टीकाही अनिल परबांनी केली आहे.

माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला.

तसेच अनिल परबांना राज्यपाल नियुक्त आमदारांबद्दल विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे. राज्यपालांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, ते १५ दिवस झालेले आहेत. ती विनंती आहे, कायदा नाही. विनंतीचे काय करायचे हे राज्यपालांनी ठरवायचे आहे. पण त्यांनी अजून काही केलेलं नाही. आता महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे पुढे काय करायचे याचा निर्णय घेतील. सगळ्या गोष्टी तपासून पुढचा निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.

तसेच, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीला अजून सव्वा वर्ष आहे. सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेना ही निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. आमचं काम नेहमीच सुरू असते. निवडणूक असो वा नसो, पक्षप्रमुख नेहमीच आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेत असतात. तसाच आढावा आता सुरू आहे. निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा हा पक्ष नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER