ना खेळणार, ना खेळू देणार… मी खेळ बिघडवणार! नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

PM Narendra Modi

नवी दिल्ली :- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुन्हा एकदा केंद्राच्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना शरद पवारांच्या नावाची ढाल पुढे केली. शरद पवार यांचे कृषी क्षेत्रातील सुधारणांविषयीची वक्तव्ये वाचून दाखवली. शरद पवार (Sharad Pawar) यांना बाजार समित्यांमधील सुधारणांविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या बचावासाठी ‘एपीएमसी’च्या बदलांना प्रमोट करण्यात येत आहे. कारण शेतकऱ्यांना ‘एपीएमसी’ मंडीचा पर्याय मिळेल, जास्त व्यापारी रजिस्टर होतील, तेव्हा स्पर्धा वाढेल आणि मंडीतील साटंलोटं बंद होईल.”

यावर मोदींनी मत व्यक्त केले की, “विरोधकांचे सरकार आहे, तिथे कृषी कायद्यांतील सुधारणांची आधीच अंमलबजावणी झाली आहे. आम्हाला प्रतिगामी नाही, तर पुरोगामी राजकारण करायचे आहे.” मोदी यांनी भाषणात भोजपुरी वाक्प्रचाराचा वापर करून विरोधकांना टोला हाणला. या विरोधकांचे कृषी कायद्यांबाबतचे वर्तन म्हणजे, ‘ना खेळणार, ना खेळू देणार, मी तर खेळ बिघडवणार!’ अशा प्रकारची टीका मोदी यांनी केली.

नागरिकांनी याचना करायला, देशात सामंतशाही आहे का?- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असताना “तुम्हाला कृषी कायदे कोणीच आणायला सांगितले नाही.” असे काँग्रेसचे खासदार बोलत होते. त्यावर मोदींनी उत्तर दिले. “देशात एखादा कायदा आणण्यासाठी नागरिकांनी याचना करण्याची वाट पाहायला, आपल्या देशात काय सामंतशाही आहे का? लोकशाही व्यवस्थेमध्ये असे चालत नाही. यात सरकारने संवेदनशील राहून जबाबदारी घेतली पाहिजे. तिहेरी तलाक, आयुषमान योजना, स्वच्छ भारत योजना किंवा मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय, हे एखाद्याने म्हटल्याप्रमाणे सरकार तसे करत नाही. तर नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने स्वत:हून हा निर्णय घेतला.” असे मोदींनी सांगितले.

कृषी कायदा निवडण्याचा अधिकार तुम्हालाच!

“कृषी कायदे हे कोणावरही बंधनकारक नाहीत. ती केवळ एक नवी व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्वीकारायची की नाही, याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. अन्यथा तुम्ही जुन्या व्यवस्थेत कायम राहू शकता. सरकारला बाजार समित्याही कायम ठेवायचे आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात बाजार समित्यांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिथे पर्याय आहेत, तिथे विरोधाचे काय कारण? जिथे फायदा होईल, तिकडे शेतकऱ्याने जावे, ते कायद्यांमध्ये आहे.” असेही मोदींनी यावेळी सांगितले.

ही बातमी पण वाचा : माझ्या भाषणात अडथळे आणणे हा पूर्वनियोजित कट, कारण…; मोदींचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER