‘भारत बंद’, महाराष्ट्रात काय काय बंद राहणार

Farmers

मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बळीराजाच्या या बंदला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून कोकणात रिक्षा आणि टॅक्सीही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यातील जनतेला फळ, भाज्या मिळणार नाहीत.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मसाला, फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट उद्या बंद राहणार आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक, पुणे बाजारपेठ बंद राहणार आहे. उद्या बंदच्या पार्श्वभूमीवर मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. यावेळी बाजार समितीत होणारे कांदा मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव होणार नाही. उद्याच्या बंदमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सीटूही सहभागी होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या बंद राहणार असून कोणत्याही शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, असं आवाहन बाजार समिती अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी केलं.

दूध, फळ-भाज्यांचा तुटवडा जाणवणार भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह प्रमुख बाजारपेठाही बंद राहणार आहेत. त्यामुळे राज्यात उद्या भाजीपाला आणि फळांची आवक होणार नाही. परिणामी जनतेला उद्या भाजीपाला-फळं मिळणं मुश्किल होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या दूधाचाही पुरवठा होणार नसल्याचं समजतं. त्यामुळे उद्या राज्यातील जनतेला कोरा चहा प्यावा लागणार आहे.

एसटीची वाहतूक बंद भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या ग्रामीण भागात एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

काय काय बंद असणार?

राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, कांदा, मका, बटाटासह इतर शेत मालाचा लिलाव राज्यातील बाजार पेठा दूध, फळे, भाजीपाल्यांचा पुरवठा होणार नाही कोकणात रिक्षा टॅक्सी बंद

काय बंद नसेल…

अत्यावश्यक सेवा मुंबईतील बेस्ट मुंबईत टॅक्सी-रिक्षा

दरम्यान, उद्या होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय लोकशाही पार्टीने पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER