नितीन गडकरी मराठी माणसांना खाली पाडण्यासाठी भाजपचा प्रचार करतील का?; संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut-Nitin Gadkari

बेळगाव :- बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आता शिवसेना आणि भाजप यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी बेळगावात प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला आहे.

मात्र, उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचाराला आले, तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.

‘कलम ३७० हटवून नेहरूंनी केलेली चूक सुधारलीत, मग बेळगावची चूकही सुधारा’

या प्रचारसभेत संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीर आणि बेळगावची तुलना करत भाजपला (BJP) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंडित नेहरू यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली होती. ती चूक भाजपने दुरुस्त केली ना? मग आता पंतप्रधान मोदींनी बेळगावमध्ये येऊन ही चूकही दुरुस्त करावी, असे राऊत यांनी म्हटले. सोबतच तुम्ही दादागिरी केलीत तर आम्ही हिटलरचे बाप आहोत. उद्या महाराष्ट्राने मनात आणले, तर कर्नाटकची पाण्यावाचून तडफड होईल, पण आम्ही माणुसकी म्हणून पाणी बंद करत नाही, असेही संजय राऊत यांनी कर्नाटकला खडेबोल सुनावले.

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून सुरेश अंगडीच्या पत्नी मंगला अंगडी, तर काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button