भारत यशाची हॅट्ट्रिक साधणार की अपयशाची? शेवटच्या सामन्यात दोन्ही शक्यता

India Vs England ODI
  • कुलदीपच्या जागी चहल, कृणालच्या जागी सुंदर आणि शार्दुल किंवा प्रसिध्दच्या जागी नटराजनला खेळविले जाण्याची शक्यता

भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या (India Vs England) वन डे (ODI) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी पूणे येथे खेळला जाणार आहे. यानिमित्ताने भारताला एक हॕट्ट्रीक (Hattrick) करण्याची संधी आहे आणि ही संधी साधली तर भारताची दुसरी एक अपयशाची हॕटट्रीक टळणार आहे. म्हणजे उद्याच्या सामन्याच्या निकाल काहीही लागला तरी भारतीय संघासाठी हॕटट्रीक निश्चित आहे.

भारताने साधावी अशी हॕट्ट्रीक म्हणजे हा सामना जर भारताने जिंकला तर वन डे सामन्यांची मालिका भारतीय संघ 2-1 असा जिंकेल आणि त्यासोबतच इंग्लंडविरुध्दच्या कसोटी, टी-20 आणि वन डे सामने अशा तिन्ही मालिका जिंकण्याची भारतीय संघ हॕट्ट्रीक साधेल.

…पण हा सामना गमावला तर वन डे सामन्यांची लागोपाठ तिसरी मालिका आपण गमावू. याप्रकारे वन डे मालिका गमावण्याची एक नकोशी हॕट्ट्रीक आपल्या नावावर लागेल. याच्याआधी आॕस्ट्रेलियातील मालिका आपण 1-2 अशी आणि त्याच्याआधी न्यूझीलंडमधील मालिका आपण 0-3 अशी गमावली आहे. त्यामुळे रविवारचा सामना टीम इंडियासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात किमान 330 धावा उभारणे हे मात्र आवश्यक आहे.

भारतीय फिरकी गोलंदाजांचे अपयश हा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) मोठा चिंतेचा विषय आहे. गेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांच्या 35 षटकात 283 धावा निघाल्या आणि त्यांना फक्त एक विकेट काढता आली. जे इंग्लिश फलंदाज कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फिरकीसमोर ढेपाळले तेच फलंदाज आता फिरकी अतिशय विश्वासाने खेळताना दिसत आहेत. यामुळे कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघाबाहेर बसावे लागणे जवळपास निश्चित आहे. त्याच्या जागी युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) खेळविले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इंग्लंडचे फिरकीपटू मोईन अली व आदिल रशीद हे मात्रचांगली कामगिरी करताना दिसत आहेत. रविवारी भारतीय फलंदाजांना या दोघांचा समाचार घेता आला तर यशाची आशा आहे.

कुलदीपच्या जागी चहल या बदलाशिवाय प्रसिध्द कृष्ण किंवा शार्दुल ठाकुरच्या जागी टी. नटराजनला खेळविले जाण्याची शक्यता आहे. पण फलंदाजीत ठाकूर हा नटराजनपेक्षा उजवा आहे हे ध्यानात ठेवावे लागणार आहे. आणखी एक बदल होऊ शकतो तो असा की, कृणाल पांड्याच्या सहाच षटकात 72 धावा फटकावल्या गेल्या, त्यामुळे त्याच्याजागी वाॕशिंग्टन सुंदरचा विचार होऊ शकतो.

इंग्लंडचे आघाडी फलंदाज भारतासाठी अतिशय धोकादायक ठरत आहेत. शुक्रवारचा सामना पहिल्या दोन झंझावाती शतकी भागिदारींनीच भारताच्या हातातून गेला. आणि पहिल्या सामन्यातही पहिल्या 20 षटकात इंग्लंड फलंदाजीच्या बाबतीत भारताच्या पुढेच होते हे मान्य करावे लागेल.

कसोटी आणि टी-20 मालिकेत पहिला सामना गमावणारा संघ म्हणजे भारत पुढे जाऊन मालिका जिंकला आहे. वन डे मालिकेत मात्र पहिला सामना भारताने जिंकलाय… त्यामुळे ही परंपरा कायम राहिली तर धोका भारताला आहे आणि इंग्लंडला ते वन डे क्रिकेटचे का विश्वविजेते आहेत हे सिध्द करण्याची संधी आहे.

याठिकाणी बेन स्टोक्स हा महत्त्वाचा ठरतो कारण महत्त्वाच्या सामन्यात त्याने नेहमीच उत्तम कामगिरी बजावली आहे. 2019 ची विश्वचषक स्पर्धा अजून स्मरणात आहे. या मालिकेत तोच भारतीय संघाची डोकेदुखी ठरला आहे. शुक्रवारची त्याची 99 धावांची वादळी खेळीच निर्णायक ठरली. पहिल्या सामन्यातही त्याच्या 34 धावात 3 बळींनी भारताच्या भागिदारी जमू दिल्या नव्हत्या. त्यामुळे तो फलंदाजी असो वा गोलंदाजी, त्याच्या संघासाठी महत्त्वाचे योगदान तो देतोय. त्यामुळे बेन स्टोक्सला रोखणे हे भारतीय संघासाठी फारमोठे आव्हान आहे.

या निर्णायक सामन्यात तरी विराट चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवतो का, याची उत्सुकता आहे.तसे झाले तर भारतीय गोलंदाजांवरील दडपण काहीसे कमी होईल. टी-20 मालिकेत हार्दिकने गोलंदाजी केली होती पण वन डे मालिकेत अद्याप विराटने त्याला ती संधी दिलेली नाही. शिवाय फलंदाजीत तोच इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांची लय बिघडवू शकतो. चांगली सुरूवात झाली तर त्याला फलंदाजी क्रमात बढती देण्याचाही विचार करता येईल. गेल्यासामन्यात त्याने 16 चेंडूतच 35 धावा केल्या होत्या हे विसरता येणार नाही.

इंग्लंडच्या संघात मार्क वूड परतला तर तो रिस टोप्ली किंवा टॉम करनची जागा घेईल असा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER